Join us

ढिगाऱ्यातून बाहेर काढला संसार, रहिवाशांचे अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 5:35 AM

डोंगरी येथील इमारत दुर्घटनेनंतर ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून या ढिगा-यातून इमारतीतील रहिवाशांनी काडी-काडी गोळा करून जमवलेला संसार बाहेर काढण्यात येत आहे.

मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेनंतर ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून या ढिगा-यातून इमारतीतील रहिवाशांनी काडी-काडी गोळा करून जमवलेला संसार बाहेर काढण्यात येत आहे. ते पाहताना स्थानिक रहिवाशांना अश्रू अनावर झाले.ढिगारा हटविताना गॅस सिलिंडर, खुर्ची, टेबल, चपला अशा विविध वस्तू सापडत होत्या. या वस्तू पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अनेकांचे डोळे पाणावले. बुधवारी रात्रीपर्यंत ढिगारा काढण्याचे काम स्थानिक रहिवासी, पालिकेचे कर्मचारी यांच्यामार्फत सुरू होते. चिंचोळ्या गल्लीतून छोटी जेसीबी आणून ढिगारा बाहेर काढला जात होता. एका ट्रकच्या साहाय्याने हा ढिगारा बाहेर नेण्यात आला. स्थानिक रहिवासी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून ढिगाºयातून मिळालेले साहित्य एका ठिकाणी रचून ठेवले. मुख्य रस्त्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका मदतीसाठी तत्पर होत्या. परिसरात गर्दी होऊन मदत कार्यात अडचण येऊ नये यासाठी येथे पोलीस ताफा वाढविण्यात आला होता. त्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.>विशेष पथकाद्वारे तपासडोंगरी दुर्घटनेप्रकरणी इमारतीची कागदपत्रे, अन्य माहिती घेण्यात येत आहे. जखमींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या दुर्घटनेस कोण जबाबदार आहे, याचा तपास विशेष पथकाद्वारे सुरू आहे. तपासाअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली. दरम्यान, अधिक तपासासाठी घटनास्थळावरील डेब्रिजचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.>जे.जे. रुग्णालयात सध्या सहा जखमी दाखल असून त्यांच्यावर विविध विभागांत उपचार सुरू आहेत. तर इम्रान कलवानिया आणि सलमा अब्दुल सत्तर शेख अशा दोघांना बुधवारी संध्याकाळी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.- डॉ. अजय चंदनवाले.जे.जे रुग्णालय अधिष्ठाता.