Join us

जागतिक पक्षाघात दिन : कोविडमुळे वाढतोय पक्षाघाताचा धोका, गुंतागुंतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 2:27 AM

World Paralysis Day News : कोविड  रुग्णांमधील पक्षाघाताचे प्रमाण हे केवळ १.५ टक्के असूनही त्यांचा बरा होण्याचा, कार्यात्मक परिणामाचा आणि मृत्यूचा दर हा नॉनकोविड रुग्णांच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे. 

मुंबई :  कोविड  रुग्णांमधील पक्षाघाताचे प्रमाण हे केवळ १.५ टक्के असूनही त्यांचा बरा होण्याचा, कार्यात्मक परिणामाचा आणि मृत्यूचा दर हा नॉनकोविड रुग्णांच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.  स्ट्रोक इन पॅन्डामिक या अभ्यास म्हणून १ मे ते ३१ ऑगस्ट या काळात पक्षाघाताच्या ४२ रुग्णांवर केलेल्या उपचारांचे विश्लेषण करण्यात आले.

जागतिक पक्षाघात (स्ट्रोक) दिवसाचे निमित्ताने नानावटी रुग्णालयाने नॉनकोविड आणि कोविड असलेल्या रुग्णांमधील स्ट्रोकबाबत न्यूरोलॉजिकल डेफिसीट (मज्जातंतूविषयक वैगुण्य), विकृती, मृत्युदर आणि वैद्यकीय परिणाम या संदर्भातील वैद्यकीय अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर केला. 

या अभ्यासानुसार, अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांच्या तुलनेत एकूण कोविड रुग्णांपैकी १.४ टक्के रुग्णांना पक्षाघाताचा झटका आला. यावरून याचा परिणाम ५ ते ६ टक्के असल्याचे निष्पन्न होते. परंतु, औषधोपचार केल्यानंतर जे कार्यात्मक परिणाम दिसून आले त्यात कोविड  रुग्णांमधील बोलण्यातील अस्खलितपणा, हाता-पायांच्या हालचाली आणि आकलनविषयक क्षमता ही अतिशय खराब असल्याचे दिसून आले. कोविड नसलेल्या ज्या रुग्णांना पक्षाघाताचा झटका आला त्यांच्यात कमी वेळात न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक सुधारणा दिसून आली.

 न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख तसेच या अभ्यासाचे मुख्य लेखक डॉ. प्रद्युम्न ओक यांनी या दोन गटांमधील फरक सांगताना लवकरात लवकर उपचार मिळविण्याचा काळ गमावणे (गोल्डन अवर) आणि संसर्ग प्रेरित प्रणालीचा सहभाग या गोष्टींना जबाबदार ठरवले. या अभ्यासाची प्रतिकृती शहरातील इतर मुख्य पक्षाघात युनिट्समध्ये राबविण्यात येणार आहे.   

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआरोग्य