जागतिक टपाल दिवस, वडिलधाऱ्यांना नमस्कार अन् छोटूला गोड गोड पापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 09:03 AM2018-10-09T09:03:12+5:302018-10-09T09:05:21+5:30
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र चिठ्ठी म्हणून कबुतरामार्फत पाठविले जाई,
मुंबई - जगभरात 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते. 25 ते 30 वर्षापूर्वी टपाल हेच आपल्या संवादाचे प्रमुख माध्यम होते. पत्रास कारण की... या वाक्याने सुरुवात व्हायची अन् संपूर्ण कुटुंबाची खुशाली कळावयची. नातेवाईकांच्या खुशालीची वाट पाहायची. पोस्टमन काका आल्यास त्यांच्यामागे धावत धावत काका आमच्या आत्याचं पत्र आलं का ? असा प्रश्न विचारायचं, 15 पैशांच्या त्या पत्रातून खूप आनंद मिळायचा. मात्र, काळाच्या ओघात ही पत्रे आता हितास जमा झाली आहेत.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्क करण्यासाठी पत्र पाठविण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे. कधी हे पत्र चिठ्ठी म्हणून कबुतरामार्फत पाठविले जाई, तर काही वेळा हे काम दुतांमार्फत केले जाई. अगदी प्रियकर-प्रेयसींनी एकमेकांशी संपर्क साधण्यापासून तर एका राज्याच्या राजाने दुसऱ्या राज्यातील राजाशी संपर्क साधण्यापर्यंत हाच पर्याय उपलब्ध होता. सन 1874 साली आजच्याच दिवशी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची (UPU) स्थापना करण्यात आली. हि घटना दळण-वळणाची जागतिक क्रांती मानली जाते. या माध्यमातून लोकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पत्राद्वारे संपर्क साधण्याचा अधिकार प्राप्त झाला. 1969 साली टोकियो (जपान) येथे भरलेल्या UPU काँग्रेसमध्ये 9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक टपाल दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस टपाल खात्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
भारतामध्ये पहिल्या टपालाच्या तिकिटाची सुरुवात सिंध जिल्ह्यामध्ये 1852 मध्ये झाली. तर 1854 पर्यंत सगळीकडे एका प्रकारच्या तिकिटांचं प्रचलन सुरू झाले. भारतातलं पहिलं रंगीत तिकीट छापण्यासाठी 1931 साल उजाडावं लागलं. पहिलं स्वातंत्र्योत्तर तिकीट 1947 मध्ये निघालं आणि त्यावर भारतीय झेंडा होता. त्यानंतर भारतामध्ये टपाल तिकिटांची रेलचेल झाली. नुकतंच काही वर्षांपूर्वी, तुमच्या निवडीनुसार तिकिटं छापण्याची सुरुवात टपाल खात्यानं प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली आहे. आज फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सअॅप आणि डिजीटल अॅपच्या माध्यमातून क्षणार्धात संदेशाची देवाण-घेवाण होते. मात्र, पोस्टमन काकाच्या पाठिमागे फिरुन आपल्या मामाचं पत्र मिळविण्यात, आपल्या आत्याची खुशाली ऐकण्यात जो आनंद होतो, तो आनंदही टपालासोबतच नाहीसा झाला आहे.