खरंच जग हे सुंदर आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 07:51 PM2019-01-06T19:51:49+5:302019-01-06T19:54:11+5:30
सायकलवरून विश्वभ्रमण करून ‘सर्वांत वेगवान आशियाई महिला’ बनण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीने केला.
सायकलवरून विश्वभ्रमण करून ‘सर्वांत वेगवान आशियाई महिला’ बनण्याचा विश्वविक्रम पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीने केला. तिच्या कामगिरीने भारतासह जगभरातील तरुणवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रवासात तिला आलेल्या अनेक अनुभवांवर वेदांगी कुलकर्णीशी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ अंतर्गत साधलेला हा संवाद.
सायकलवरून विश्वभ्रमण करण्याचा व विक्रम करण्याचा विचार नेमका मनात कसा आला?
मला आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची लहानपणापासून आवड होती. जगाचा प्रवास करण्याची माझी इच्छा होती. यूकेमध्ये असताना मी सायकलद्वारे अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. जगभ्रमंतीला सायकलवरून जाण्याचा विचार अशाच एका क्षणी सुचला व त्यावर मी गांभीर्याने विचार करू लागले. त्यासाठी यापूर्वी कोणते विक्रम झाले आहेत याची माहिती घेतली. त्यामध्ये सायकलद्वारे जगभ्रमण करण्याबाबत मी अधिक माहिती घेतली व हा विक्रम करण्याचे नक्की केले. गिनीज बुकमध्ये विक्रम होण्यासाठी अनेक नियम आहेत. त्यात २९ हजार किमी अंतर सायकल चालवणे, एकाच दिशेने प्रवास करणे, एकाच सायकलने प्रवास करणे, जीपीएस रेकॉर्डिंग करणे, लॉग बुकमध्ये स्वाक्षरी करणे अशा काही अटींचा समावेश आहे. पृथ्वीच्या मध्यावरून सरळ रेषा काढली तर ती रेषा दुसऱ्या ठिकाणी जेथे पोचेल तिथपर्यंतचे अंतर कापावे लागते. मी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून प्रवासाला प्रारंभ केला होता. लोकांना भाषा कळली नाही तरी भाव कळतो हे एकंदर प्रवासात मला कळून चुकले.
हा विक्रम करताना नेमके किती अंतर प्रवास केला व किती देशांमधून प्रवास झाला?
१४ देशांमधून माझा प्रवास झाला. १५९ दिवसांत दररोज सुमारे ३०० किमी प्रवास केला आहे. समुद्रकिनारी असलेल्या प्रदेशांमधून प्रवास करण्यास मी प्राधान्य दिले होते. जिथून या प्रवासाला प्रारंभ केला तिथे पुन्हा जावे लागते. मार्ग ठरवण्याचे बंधन नव्हते. पर्थ ते ब्रिस्बेन हा प्रवास केला व टप्प्याटप्प्याने पुढील प्रवास केला. रशियन व्हिसाची मुदत संपत आल्याने काही मार्ग बदलावा लागला.
प्रवासाचे टप्पे केले होते का?
पहिल्या टप्प्यात अर्ध्या मार्गावर जाईपर्यंत माझा वेग जास्त होता. मात्र स्पेनमध्ये झालेल्या घटनेमुळे माझा वेग कमी झाला. ५५ दिवसांत मी अर्धे अंतर पार केले होते.
स्पेनमध्ये काय अनुभव आला होता?
स्पेनमध्ये चाकूच्या धाकावर माझी आर्थिक लूट करण्यात आली. मला मारहाण करण्यात आली होती. मला डोक्याला मार लागल्याने त्या वेळेची स्मृती गायब झाली होती. डोंगर चढताना मला मारहाण करून खाली ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या स्थितीतही मला माझ्या दुखापतीऐवजी माझ्या सायकलची जास्त काळजी होती. मात्र, सुदैवाने मला दुखापत झाली असली तरी माझ्या सायकलला नुकसान पोहोचले नव्हते ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती. कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट गाठायचेच हा माझा निर्धार होता. त्यानंतर माझा वेग मंदावला होता. मात्र मी थांबले नाही. पण, मी जाणीवपूर्वक सपोर्ट टीमचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. जे काही करायचे ते स्वत:च्या क्षमतेवर करायचे हा माझा निर्धार होता. मात्र, स्पेनमध्ये लूट झाली असली तरी तेथील लोकांनीच मला मदत केली ही वस्तुस्थिती आहे.
या प्रवासात उत्तम देश कोणता वाटला?
मी कॅनडाचे नाव घेतले तर रशियावर अन्याय होईल व रशियाचे नाव घेतले तर कॅनडावर. रशियात Þउणे ६ इतके तापमान होते. तिथल्या प्रचंड थंडीमुळे कुमेज नावाचा पौष्टिक पदार्थ मला प्रत्येक जण देत असे. त्यामध्ये घोडीचे दूध असते. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्याचा मोठा फायदा झाला. थंडीपासून वाचण्यासाठी मी प्लॅस्टिक बॅग शोधत असताना एका आजीने मला चांगली प्लॅस्टिक बॅग आणून दिली. मला मदत करण्यासाठी सर्व जण इच्छुक असल्याचे आढळले. उबदारपणासाठी स्लीपिंग बॅगमध्ये झोपत होते. मात्र ट्रक चालकाने मला ट्रकच्या मागील भागात झोपण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रवासात कुणाला हो म्हणायचे, कुणाला नाही म्हणायचे याचा निर्णय माझ्या अंतर्मनाद्वारे घेत होते. देशाची पाहुणी आहे अशीच वागणूक मला मिळत गेली. या एकूणच प्रवासात माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन पूर्ण बदलला. सगळीच माणसे चांगली असतात.आपण त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघतोय यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात, हे जाणवले खरच जग सुंदर आहे याची अनुभूती मला या प्रवासाने मिळाली.
विविध देशांचा व्हिसा मिळण्याबाबत कसा प्रतिसाद मिळाला?
व्हिसा मिळवण्यासाठी मला अनेक दिवस वाया घालवावे लागले. एका क्षणी तर केलेले सर्व कष्ट वाया गेल्यासारखे वाटले. यूके दूतावासाने मी ज्या देशांमधून जाणार होते त्या सर्व देशांमधील राजदूतांना माहिती दिली होती. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. व्हिसासाठी अनेकदा फार परिश्रम करावे लागले. दोन दिवसांत मिळणाºया व्हिसासाठी मला ८ दिवस लागले होते. निघण्यापूर्वी कॅनडाचा व्हिसा नाकारण्यात आला होता. व्हिसा मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यासाठी मोठा वेळ खर्ची करावा लागला. त्यामुळे मानसिक तणावदेखील वाढत होता.
एवढ्या प्रतिकूल हवामानात फिटनेस कसा कायम ठेवला?
सायकलवर बसल्यावर सायकल चालवता येते यावर माझा विश्वास होता. सुरुवातीच्या १५ दिवसांत फूड पॉयझन झाले होते तरीही दिवसाला २५० किमी सायकल चालवत होते. माझी क्षमता वाढवण्यासाठी त्याचा लाभ झाला.
कॅनडात अस्वल तुझ्या मागे लागले होते त्या अनुभवाबाबत?
कॅनडातून जाताना एका अस्वलाचे कुटुंब रस्त्याशेजारी होते. त्यामधील मोठे अस्वल माझा पाठलाग करत होते. त्यापासून वाचवण्यासाठी मी वेगाने जात होते. त्या वेळी अपघात होता होता वाचला. अनेक प्रसंगांत घाबरून चालणार नाही याची जाणीव झाली.
दिनक्रम कसा असायचा, रात्री प्रवास करण्याची भीती वाटली नाही का?
रात्री १२ ते ४ या कालावधीत झोप घेऊन मी प्रवास करत असे. दुपारी एक तास विश्रांती घेत असे. उन्हाच्या तुलनेत मला थंडीचे वातावरण आवडते. रात्री सायकल चालवताना रस्ता आपला असल्याची भावना असते. मी एकेठिकाणी स्थिर झाल्यावर घरच्यांना माहिती देत असे. वडील फोन करून रात्री प्रवास करू नकोस, असा सल्ला द्यायचे. मात्र मला रात्री सायकल चालवणे अधिक चांगले वाटायचे.
मात्र एका देशातून दुसºया देशात गेल्यावर त्या टाइम झोनशी जुळवून घेण्यासाठी २४ तासांमध्ये मला आवश्यक असलेली झोप पूर्ण करून मी सायकल प्रवास सुरू करायचे. पॅसिफिकवरून दुसºया दिशेने आल्यावर एका ठिकाणी १७ तास मागे गेले होते, त्या वेळी जुळवून घेताना थोडासा त्रास झाला. उणे १८ अंश सेल्सिअस तापमानावरून भारतात आल्यावर थेट ३३ अंश सेल्सिअस तापमानात प्रवास करावा लागला. त्याचा फटका बसला. सातत्याने तहान लागत होती.
हा विक्रम करताना काही सामाजिक संदेश देण्याचा विचार होता का?
या प्रवासाला निघताना सामाजिक संदेश देण्याचा विचार नव्हता. नवीन विक्रमासाठी निघताना अनेकांशी बोलून सामाजिक संदेशाबाबत विचार करता येईल.
मुलगी म्हणून तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता?
प्रवासात अनेकांनी मला मदत केली. मुलगी म्हणून पाहिल्याचे अनुभव आले नाहीत. युरोपमध्ये, कॅनडामध्ये नागरिकांना मला पाहताच या उपक्रमाबाबत विचारावे असे वाटायचे. मात्र भारतात सायकल पाहिल्यावर पहिला प्रश्न किमतीबाबत विचारायचे हा फरक मला जाणवला. पैसे नसले तरी मी विश्वभ्रमण करू शकते हा आत्मविश्वास आता आला आहे. जग फिरण्यासाठी इंटरेस्ट असणे आवश्यक असते. अडथळे असले तर त्यांना ओलांडून पुढे जाण्याची धमक व इच्छा असणे गरजेचे असते. एकटी मुलगी सायकलने जाताना पाहून या मुलीमध्ये काहीतरी वेगळा आत्मविश्वास आहे याची जाणीव पाहणाऱ्यांनादेखील होते.
सोशल मीडियावर सक्रिय होतीस का?
विविध विक्रम करण्यासाठी इच्छुक तरुणाईसाठी १८ हजार पौंड्स जमवण्यासाठी मी सोशल मीडियावरून आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व एका पोस्टमध्येच चांगला निधी तयार झाला. या इच्छुक तरुणांना ४ हजार पौंड्स देऊन साहाय्य करण्याचा माझा मनोदय आहे. विक्रम ज्या बाबतीत असेल त्यांच्याशी संबंधित कंपन्या आवश्यक बाबी पुरवण्यासदेखील तयार आहेत. या प्रवासाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून डॉक्युमेंट्री बनवण्यात येणार आहे.
प्रवासादरम्यान कुठे थांबावे असे वाटले का, मित्र-मैत्रिणींचे सहकार्य कसे मिळाले?
काही अडचणी आल्या तरी उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाही या निर्धारावर मी कायम राहिले. प्रशिक्षणादरम्यान अनेकदा रात्री लवकर झोपावे लागायचे. त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबत कमी कालावधी मिळायचा. पण त्यावरही मात केली.
मोदींनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केल्यानंतर काही प्रतिक्रिया आली का?
पंतप्रधानांनी आवर्जून दखल घेतली. मात्र तरीही तशी काही विशेष प्रतिक्रिया आलेली नाही. राहुल गांधी, अजित पवार यांनी टिष्ट्वट करून कौतुक केले. मात्र, राज्य सरकारला या कामगिरीचे काही गांभीर्य नसल्यासारखी परिस्थिती आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही मदत केली, परराष्ट्रमंत्र्यांना कळवले. त्यानंतर मी ज्या