Join us

जागतिक जल दिनी पाणी संवर्धनाची व बचतीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:06 AM

मुंबई : जागतिक जलदिनी ऑनलाईन पद्धतीने शेतातून थेट दारी भाजीपाला व फळे पुरविणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी बचाव व संवर्धन ...

मुंबई : जागतिक जलदिनी ऑनलाईन पद्धतीने शेतातून थेट दारी भाजीपाला व फळे पुरविणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी बचाव व संवर्धन करण्याची शपथ घेतली. त्याचबरोबर, भाजीपाला व फळे शेतात पिकविताना पर्यावरण पूरक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचीही प्रतिज्ञा केली. येणाऱ्या काळात पाणी वापरासंबंधी अभिनव पद्धतींचा व प्रक्रियांचा वापर करण्याचाही त्यांनी संकल्प सोडला. पाण्याच्या सुयोग्य वापराने फक्त संवर्धनच नाही तर भाजी व फळांच्या उत्पादन व प्रती मध्येही नैसर्गिकरित्या उच्च गुणवत्ता सातत्यपूर्ण देण्याचा आशावादही व्यक्त केला.

प्रागतिक शेतकरी या नात्याने हवामान बदलाचा वेध घेत त्याप्रमाणे आपल्या पीक मशागत पद्धती व पर्यावरणयोग्य शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात पाणी बचत व संवर्धनासाठी स्वतःच पुढाकार घ्यायचे ठरविले आहे. या बाबतीत राजेंद्र लबडे म्हणाले की, आम्ही सर्व शेतकरी जलदिनी पाणी संवर्धनातून पर्यावरण पूरक शेतीची शपथ घेतो आहोत. यात शेतात पाणी वापरण्याच्या व मृदसंधारण पद्धतींचा विचार करून अन्य तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रेरित केले जाईल. यासाठी आम्ही जल व मृदतज्ज्ञ आणि श्रीरामपूरजवळील राहाता येथील कृषी विज्ञान केंद्राची मदत घेत आहोत.

अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ६२१ मिलिमीटर पाऊस पडतो व तोही वर्षातील सरासरी ४६ दिवस. शेतकऱ्यांना उपलब्ध पावसातून निर्माण होणारा जलसाठा वर्षभराच्या शेतीसाठी नियोजनबद्ध रितीने वापरावा लागतो. त्यामुळे पाण्याचे संवर्धन गरजेचे व परिणामकारकही आहे. पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टीने अनेक पद्धतींचा तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करीत आहोत, असे श्रीकांत ढोकचवळे म्हणाले.

शेतकऱ्यांनी पाणी, माती व ओलाव्याचा अधिक परिणामकारक वापर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ठिबक सिंचनाबरोबरच शेतात पाणीसाठे व शेततळी निर्माण करणे, शेतांच्या बांधांवर छोटे जलमार्ग तयार करणे, ओहोळ तयार करणे, पाणी जिरवणे, तिरप्या पद्धतींची पीकपेरणी, इत्यादी मार्गांचा अवलंब केला जाणार आहे. पेरणी, नांगरणी व मशागतीसाठी पाणी वापराबरोबरच वातावरणातील ओलाव्याचा वापर करणे, दगडांचे छोटे बांध करून पाणी अडविणे तसेच शेतांची लहान लहान भागांत विभागणी करून मृद्संधारण करणे, या गोष्टींचा अवलंब करण्याचे ठरविले आहे.