Join us

जागतिक मंदीतही बेस्ट कामगारांचे पगार वाढतील;  उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:05 AM

एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही; इलेक्ट्रिक बस, बेस्ट मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण

मुंबई : आर्थिक मंदीतही बेस्ट उपक्रमातील एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही. उलट कामगारांचे पगार वाढणारच आहेत. कामगारांमध्ये विष पसरविणाऱ्या नागोबांच्या नादाला लागलात तर पदरात काहीच पडणार नाही, असा कृती समितीच्या नेत्यांना टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट कामगारांना एकत्रित येण्याचे आवाहन सोमवारी केले. बेस्ट उपक्रमाचे मोबाइल अ‍ॅप आणि इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

बसगाड्यांची वेळ अचूक सांगणाºया बस ट्रॅकिंग मोबाइल अ‍ॅप आणि इलेक्ट्रिक बस सेवेचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कुलाबा येथील बेस्ट आगारात झाले. या कार्यक्रमात महापौर विश्वनाथ महाडेश्वर, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर, महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते. या वेळी लोकार्पण करण्यात आलेल्या ‘बेस्ट प्रवास’ या मोबाइल अ‍ॅपमुळे मुंबईकरांना आता बसगाडी थांब्यावर येण्यास किती वेळ लागेल हे समजणार आहे.

शिवसेनेच्या मध्यस्थीने बेस्ट कामगारांच्या सुधारित वेतनाच्या वाटाघाटी पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र कृती समितीच्या नेत्यांना हे मान्य नाही. याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला.

टॅग्स :बेस्टउद्धव ठाकरे