जागतिक योग दिन: योगामुळे मिळते तणावमुक्ती; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:25 PM2019-06-20T23:25:35+5:302019-06-20T23:25:46+5:30
ताणतणाव मुक्त होण्यासाठी वैद्यकीय उपचार , समुपदेशन आणि योगचा मार्गही अवलंबायला हवा असे मत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
मुंबई : स्पर्धेच्या युगामुळे ताण- तणावाची व्याप्ती वाढत असून लहान मुले असो किंवा तरुण-तरुणी, पुरूष असो किंवा महिला, या सर्वांसह वृध्दांना देखील याने आपल्या कवेत घेतले आहे. ताणतणाव मुक्त होण्यासाठी वैद्यकीय उपचार , समुपदेशन आणि योगचा मार्गही अवलंबायला हवा असे मत जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
ताणतणावाविषयी औषधोपचार सुरू असताना योग साधना केल्यास बरे होण्याचा कालावधी निश्चितच कमी होतो, या विषयी मानसोपचारतज्ञ डॉ प्रभाकर वायदंडे यांनी सांगितले की, योग हा शारीरिक तंदुरुस्ती देणारा आणि आत्म्याला त्याच्या मूळ स्रोताशी जोडणारा असा सर्वंकष मार्ग आहे. योग साधनेमुळे शरिर आणि मन यांच्या आरोग्यास अनेक फायदे होतात़ पण तो औषधोपचारास पर्याय नाही. तज्ज्ञ योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने करणे अत्यंत महत्वाचे आहे. जर काही आजाराची लक्षणे असतील तर डॉक्टर आणि योग प्रशिक्षक यांच्या साल्यानेच योगसाधना करावी.
तर मानसोपचारतज्ञ डॉ स्वामी निलंडे यांनी सांगितले की, योगिक ध्यान हा एक बोजड शब्द वाटतो. खरे तर, स्वत:शी असलेले नाते पुन्हा एकदा जाणून शांत आणि स्थिरचित्त होण्यासाठी योग ही एक सोपी पद्धत आहे. शांत व्यक्ती खूप जास्त कार्यक्षम, कामात चांगली, उत्तम माणूस, विश्वासू असते. नियमितपणे रोज पंधरा मिनिटे ध्यान प्रत्येक व्यक्तीचे ताण तणाव, समाजाकडून अपेक्षांचे ओझे कमी करते. तिला प्रचंड भावनिक शक्ती मिळू शकते. आजच्या नोकरी व्यवसायात अनेक आव्हानांना धैर्याने तोंड द्यावे लागते.
औषोधोपचार हवेच
उपचार, ध्यान आणि योगासने नियमितपणे केल्याने मानसिक आघातातून सावरता येते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यानेही गोष्टी बदलू शकतात. मित्र आणि कुटुंबियांनी मानसिक आघात झालेल्या व्यक्तींना सावरायला, उत्साहाने जीवन जगायला मदत करावी. योगामुळे शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो आणि आरोग्य सुधारते. तरीही तो औषधांना पर्याय नाही. प्रशिक्षित योग शिक्षकांकडून योगासने शिकणे महत्त्वाचे आहे.