मुंबई : जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलला मुंबईत सोमवारी प्रारंभ झाला. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस हा कार्निव्हल भर समुद्र्रात रंगणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या हस्ते या कार्निव्हलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जलेश क्रुझचे सल्लागार राजीव दुग्गल, ज्वेल ट्रेंड्जचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गोविंद वर्मा उपस्थित होते. या कार्निव्हलमध्ये देशातील साठ कंपन्यांनी सहभाग घेतला असून, भारतासह इतर आठ देशांतील साडेतीनशे रिटेल व्यापारी या कार्निव्हलला उपस्थित आहेत.भाटिया म्हणाले, क्रुझ पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जहाजावर ज्वेलरी कार्निव्हल आयोजित करण्याचे हे बहुधा जगातील पहिले उदाहरण आहे. यासाठी तटरक्षक दलाशी बोलण्यात आले असून, या जहाजाच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ज्वेलरी कार्निव्हलसाठी सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. क्रुझ शिपवरील जीएसटी कमी करण्यासाठी सरकारशी संवाद साधण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वर्मा म्हणाले, यामध्ये तीन हजारपासून तीन कोटी रुपये किमतीपर्यंतचे दागिने ठेवण्यात आले आहेत. जुनागढ, हैदराबाद यांसह देशातील विविध स्थानिक पातळीवरील दागिने येथे ठेवण्यात आले आहेत. अकराव्या मजल्यावर हे प्रदर्शन भरवले असून, तेथे सुमारे चार ते पाच टन वजनाचे सोन्याचे दागिने व हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. क्रुझ पर्यटनाला मिळत असलेला चांगला प्रतिसाद पाहून जलेश कर्णिका या भारताच्या पहिल्या क्रुझच्या ताफ्यात आॅक्टोबरपर्यंत आणखी एका क्रुझची भर पडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलेशचे सल्लागार राजीव दुग्गल यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत पाच जहाजे आणण्याचा बेत त्यांनी जाहीर केला.
जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलचा मुंबईत झाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 1:13 AM