Join us

वरळी सशस्त्र दलात बारा वर्षांपासून १६३ पोलीस एकाच ठिकाणी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 5:38 AM

मुंबई : पोलीस अंमलदारांना एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे व साइड ब्रॅँचला सहा वर्षांचा कार्यकाळ निश्चित आहे, पण मुंबई ...

मुंबई : पोलीस अंमलदारांना एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे व साइड ब्रॅँचला सहा वर्षांचा कार्यकाळ निश्चित आहे, पण मुंबई पोलीस दलाच्या वरळीतील सशस्त्र (एलए) विभागातील तब्बल १६३ अंमलदार गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. विविध राजकीय नेते व वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांकडे हे अंमलदार वर्षानुवर्षे संरक्षक/ मदतनीस म्हणून कार्यरत आहेत.

मुंबई पोलीस दलातील सहायक फौजदार सुनील टोके यांनीच ही माहिती अधिकारातून ही बाब उघडकीस आणली आहे. वरळी सशस्त्र दलात दहा ते १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत असलेल्या अंमलदारांची माहिती त्यांनी ‘आरटीआय’अंतर्गत मागितली होती. त्यानुसार, तब्बल १६३ अंमलदाराची यादी त्यांना देण्यात आली असून, त्यापैकी अनेक जण राजकीय नेते व वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांचे कार्यालय किंवा निवासस्थानी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. टोके यांनी वाहतूक शाखेच्या गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर, ते सातत्याने खात्यातील गैरकृत्याबाबत आवाज उठवित राहिले आहेत. त्यामुळे त्यांना गैरवर्तन व शिस्तभंगाच्या कारवाई अन्वये ४ महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले असून, त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे.

पोलीस दलातील सेवाशर्ती व नियम सगळ्यांना सारखे असताना, १६३ अंमलदार एकाच ठिकाणी इतकी वर्षे कसे काम करू शकतात. ही आकडेवारी केवळ वरळी सशस्त्र दलातील असून, अन्य ठिकाणीही असाच प्रकार आहे. याविरुद्ध वरिष्ठांकडून जोपर्यंत कार्यवाही होत नाही, त्याविरुद्ध आवाज उठवित राहणार आहे. - सुनील टोके ( निलंबित सहायक फौजदार)