राज ठाकरेंच्या नावाने व्हायरल होणाऱ्या 'त्या' पत्रावर पोलिसांची कारवाई; मनसेने केली होती तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:50 PM2024-11-20T17:50:11+5:302024-11-20T17:51:46+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Worli Assembly Constituency : महाराष्ट्र विधानसभेसाठी २८८ जागांवरील मतदानाची वेळ संपण्यासाठी आता थोडाच वेळ उरला आहे. अशातच सकाळच्या सुमारास वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये शिवसेना (शिंदे) गटाला मनसेचा पाठिंबा दिल्याचे म्हटलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे राज ठाकरे यांची सही देखील या पत्रावर होती. त्यानंतर हे पत्र खोटं असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी आता एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने एक बनावट पत्र व्हायरल केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता. या पत्रावर राज ठाकरे यांची बनावट सही देखील असून त्यांनी वरळीत शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असल्याचा दावा त्यातून करण्यात आला होता. यावेळी मनसे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली होती. शिवसेनेचे शाखाप्रमुख राजेश कुसळे हे वरळी मतदारसंघात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला होता.
याप्रकरणी आता मनसेच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे उपविभाग सचिव अक्रुर पाटकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी राजेश कुसळेंविरोधात आग्रीपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(४), ३५३(२) व १७१(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कुसळे हे शिंदे गटाचे माजी शाखाप्रमुख असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर वरळी मतदारसंघात खळबळ उडाली होती. मनसेचे उमेदवार असलेल्या संदीप देशपांडे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्याशी संपर्क साथला आणि त्यानंतर हे पत्र खोटे असल्याचे समोर आलं. मतदानाच्या दिवशीच बुधवारी पहाटेपासून हे पत्र वरळी विधानसभा मतदारसंघा, आग्रीपाडा परिसरात व्हायरल झाले होते.
काय म्हटलं होतं पत्रात?
"आपण विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे आणि त्याचे दायित्त्व म्हणून हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी वरळीत धनुष्यबाणाला पाठींबा देऊन शिवसेनेला (शिंदे) समर्थन देणार आहे. आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसीत महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या, २० नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्यने मतदानाचा हक्का बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे," असे या पत्रात म्हटलं होतं.