उद्या वरळी बंद, आंबेडकरी संघटनांचं ठरलं, शिवसेनेचा पाठिंबा; शांततेच्या मार्गाने निषेध करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 03:45 PM2022-12-14T15:45:19+5:302022-12-14T15:46:19+5:30
उद्या सकाळी वरळीत सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.
मुंबई-
महापुरूषांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण आता दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून काल पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आता मुंबईतही गुरुवारी 'वरळी बंद'ची हाक देण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वरळीत बंद पाळण्याचं आवाहन सर्व आंबेडकरवादी तसेच बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या पक्ष संघटनांनी केलं आहे.
भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आमदार राम कदम यांनी घरात घुसून प्रत्युत्तर देण्याचं धमकीवजा वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. राम कदम यांच्या विरोधात एफआयआर दाखल करुन घेण्याची मागणी वरळीतील आंबेडकरवादी संघटानांनी केली होती. आज दुपारी जॉइंट सीपी चव्हाण यांच्या कार्यालयात 'वरळी बंद' मागे घेण्यासंदर्भात एक बैठक झाली. यात राम कदम यांच्याविरोधात एफआयआर दाखल करुन घ्या, मग बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका संघटनांनी घेतली होती.
पोलिसांनी याबाबत संबंधित विभागाकडे हे प्रकरण पाठवण्याचं आश्वासन यावेळी दिलं. पण एफआयआर अद्याप दाखल न झाल्यामुळे आंबेडकरी संघटना बंदवर ठाम आहेत. उद्या सकाळी वरळीत सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.
'वरळी बंद'ला वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती-शिवशक्ती, रिपाई, बसपा, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. यावेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं जाणार नाही. शांततामय मार्गानेच बंद केला जाईल असं बंदमध्ये सहभागी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.