- नारायण जाधव ठाणे : गेल्या महिन्यात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने बहुचर्चित वांद्रे ते वर्सोवा सी लिंकच्या कामाचे कार्यादेश दिल्यानंतर, आता त्याचा विरारपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या सुसाध्यता अहवालासाठी रस्ते विकास महामंडळाने आता सल्लागाराचा शोध सुरू केला आहे.वरळी ते वांद्रे सी लिंकनंतर बहुचर्चित वांद्रे ते वर्साेवा या सी लिंकचे कंत्राट अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला इटलीच्या अल्तादी कंपनीसोबत संयुक्त भागीदारीत सात हजार कोटींना देण्यात आले आहे. त्यानंतर, आता रस्ते विकास महामंडळाने दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांंसह उत्तर मुंबईला जोडणाऱ्या वर्सोवा ते विरार ते या ५४ किमीच्या तिसऱ्या सी लिंकच्या कामाला मुहूर्त शोधला असून, त्यासाठीचा सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.सध्या वरळी ते वांद्रे सागरी सेतूनंतर आता वांद्रे ते वर्साेवा या १७.७ किमीच्या सागरी पुलाच्या बांधकामाचे सात हजार कोटींच्या कंत्राटाचे कार्यादेश नुकतेच देण्यात आले आहे. या पुलामुळे वांद्रे ते वर्सोवा हे दोन तासांचे १५ मिनिटांत कापता येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११,३३२ कोटींचा असून, त्यात अभियांत्रिकी कामे सात हजार कोटींची आहेत.यापुढची पायरी म्हणून या सी लिंकचा पुढे विरारपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निधीच्या चणचणतेमुळे त्याचा सुसाध्यता अहवाल तयार करण्याचे काम रखडले होते. तेच काम आता सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा अहवाल आल्यावर पर्यावरण आणि सीआरझेडच्या मान्यतेनंतर प्रत्यक्षात याचे काम सुरू होणार असले, तरी सल्लागार नेमणे, ही यातील महत्त्वाची पायरी होती.मढ आयलंडसह गोराई बीचला जोडणारप्रस्तावित वर्साेवा-विरार सी लिंक मार्ग हा मढ आयलंड, गोराई बीच, आगाशी रोड येथे कनेक्ट करण्यात येणार असून, मनोरी येथील खाडीपूल याचाच भाग असणार आहे. याचा खर्च किती असणार, याचे अंदाजपत्रक सुसाध्यता अहवाल आल्यावरच कळणार आहे.भार्इंदर-वसई खाडीपुलास लाभविस्तारित सागरी सेतूचा एमएमआरडीएच्या प्रस्तावित मुुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाºया खाडीपुलासही मोठा फायदा होणार आहे. या पुलावर एमएमआरडीए १,०८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार असून, त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होऊन, आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणाºया लाखो वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे. खाडीवरील हा पूल पाच किमी लांबीचा राहणार असून, तो ३०.६ मीटर रुंद असा सहापदरी राहणार आहे.नवी मुंबई विमानतळाला फायदाहा संपूर्ण सागरी मार्ग भविष्यात सध्याच्या ईस्टर्न फ्री वे आणि प्रस्तावित न्हावा-शेवा-शिवडी सी लिंकला जोडण्यात येईल. यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरे अधिक जवळ येतीलच, शिवाय दक्षिण मुंबईसह नवी मुंबई गाठणे सुकर होईल. याचा फायदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला होणार आहे.
वरळी-वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचा विरारपर्यंत लवकरच होणार विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:22 AM