मुंबई – गेल्या अनेक वर्षापासून वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ताटकळत राहिला आहे. या काळात कित्येक सरकार आली आणि गेली मात्र पोलिसांच्या घराबाबत कोणत्याही सरकारने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता पोलीस पुत्रांनी नवा एल्गार पुकारला आहे. ‘पोलीस परिवार’ या नावाखाली अनेक कुटुंबांनी ‘घरं नाही तर मतं नाही’ अशी ठामपणे भूमिका घेतली आहे.
अनेक राजकीय पक्षांनी आजवर पोलिसांच्या घराबाबत आश्वासनं दिली परंतु प्रत्यक्षात बीडीडीतील रहिवाशांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे पोलीस परिवार ही नवी चळवळ सुरू करण्याचं पोलिसांच्या मुलांनी ठरवलं आहे. या प्रकरणी शुक्रवारी बीडीडीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सामाजिक क्षेत्रात असलेल्या मान्यवरांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ही नवी चळवळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे कोणताही निवृत्त पोलीस राजकीय झेंडा हाती घेणार नाही असं वचनचं बैठकीत घेण्यात आले.
पोलीस कुटुंबाच्या हक्कांसाठी हा लढा सुरू ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आजवर अनेक राजकीय पक्ष पोलीस कुटुंबाच्या जोरावर मोठे झाले पण आता एकाही राजकीय पक्षाला पोलीस परिवार थारा देणार नाही असं या बैठकीत ठरवण्यात आलं. इतकचं नाही तर राजकीय पक्षांनी आता तोंडी पाठींबा नको तर लेखी पाठिंबा द्या असंही सांगण्यात आलं. त्यानंतर सोमवारी सकाळी मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी या पोलीस परिवाराची भेट घेतली.
या पोलीस परिवाराला मनसेने थेट लेखी पाठिंबा दिला आहे.आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच पोलिसांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिलेत. आझाद मैदान दंगलीवेळीही पोलिसांवर हल्ला झाला त्याविरोधात मोर्चा काढणारा मनसे एकमेव पक्ष होता. त्यामुळे पोलिसांच्या घरासाठी सक्रीय लढ्यात मनसेही उतरणार आहे असं संतोष धुरी यांनी पोलीस परिवाराला आश्वासन दिलं.
याबाबत पोलीस परिवारातील विकास राजवाडे म्हणाले की, गेल्या ५ वर्षापूर्वी आपण ही चळवळ उभी करायला हवी. ही घरं आपल्या नावावर होणार आहे. एकीचं बळ राज्य सरकारला दाखवून द्यावचं लागेल. अनेक सरकार आले, पक्ष आले, आश्वासनं दिली मात्र सगळ्यांना विसर पडला आहे. आपण एक झालो तर सरकारला हादरवू शकतो. ही लढाई पोलीस परिवारच जिंकणार आहे. कारण हा एकजुटीचा लढा आहे असं त्यांनी सांगितले.
तर छत्रपतींनी आपल्याला लढण्याची ताकद दिली. निवृत्त अधिकाऱ्यांनी जी कोर्टात केस उभी केली आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग दाखवला आहे त्याप्रमाणे पुढे जाईल. राजकीय मतभेद विसरून या लढाईत पोलीस परिवारासोबत राहा. वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे हातात घेतले आता कोणत्याही पक्षाचा झेंडा नको. बांगलादेशी, परप्रांतीय येऊन झोपड्या बांधतात त्यांना घरं दिली जातात. ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाची नाही तर पोलीस कुटुंबाची आहे. आपण आपल्या हक्कांसाठी लढत राहणार आहोत. प्रत्येक पोलीस परिवारातील घरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली जातील. जोपर्यंत ही घरं नावावर होत नाहीत तोपर्यंत ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहोत असं पोलीस परिवारातील वैभव परब यांनी सांगितले.