मुंबई : मुलगा आणि नातेवाइकांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पोलीस शिपायाला लाखोंचा गंडा घातल्याची घटना वरळीत घडली. यामध्ये त्यांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.चेंबूर परिसरात भगवान गोपाळ मोहिते (५४) हे कुटुंबीयांसोबत राहतात. ते परिवहन विभागाच्या वरळी पोलीस एम.टी. येथे पोलीस नाईक (तांत्रिक) पदावर कार्यरत आहेत. मुलगा अनिकेत हा विज्ञान शाखेत शिक्षण घेतो. ते मुलासाठी नोकरीच्या शोधात असताना, ओळखीच्या तरुणाकडून त्यांना विशाल पालांडेबाबत समजले. पालांडेची पालिकेत ओळख असून, तो मुलाला पालिकेत नोकरी लावण्यासमदत करेल, अशी माहिती त्यांना मिळाली.मुलगा अनिकेत, पुतण्या रोहित भीमराज मोहिते (२६) आणि मित्र विजय पाटील या तिघांना नोकरी लावण्यासाठी आॅगस्ट २०१६ मध्ये त्यांनी पालांडेची भेट घेतली. त्याने श्रमिक व शिपाई पदासाठी ३ लाख आणि लिपिकसाठी ५ लाख रुपये दिल्यास काम लवकर होईल, असे सांगितले. पुढे तिघांचे मिळून एकूण १० लाख रुपये देण्याचे ठरले. बनावट कागदपत्रे देऊन पालांडेने त्यांचा विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे पुढे करून त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५० हजार रुपये उकळले.फेब्रुवारी २०१७ नंतर पालांडे आणि त्याच्या साथीदारांनी फोन उचलणे बंद केले. अखेर यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, मोहिते यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी सागर जाधव, विशाल पालांडे व प्रभाकर गंगावणे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.<पालिकेत नोकरी लावण्यासाठी १० लाख रुपये देण्याचे ठरले. बनावट कागदपत्रे देऊन पालांडेने विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे पुढे करून त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५० हजार रुपये उकळले.
वरळीत पोलिसालाच लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:35 AM