वरळीतील ग्राहकांचे फोन आणखी चार महिने बंद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:29+5:302021-06-16T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या महिनाभरापासून एमटीएनएलचे लॅण्डलाईन कनेक्शन बंद असल्याने त्रस्त झालेल्या वरळीतील ग्राहकांना आणखी चार महिने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या महिनाभरापासून एमटीएनएलचे लॅण्डलाईन कनेक्शन बंद असल्याने त्रस्त झालेल्या वरळीतील ग्राहकांना आणखी चार महिने फोन सुरू होण्याची वाट बघावी लागेल. कारण एमटीएनएलच्या कंत्राटदाराने अद्याप दुरुस्तीकाम हाती घेतलेले नाही. भूमिगत वाहिनीत बिघाड झाल्याने खोदकाम करावे लागणार आहे आणि पावसाळ्यात त्यासाठी परवानगी मिळणे अवघड आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे दूरसंचार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने केबल तुटल्या, मुसळधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांना पाणी लागून सेवा विस्कळीत झाली. खासगी सेवादारांनी अवघ्या दोन-तीन दिवसांत दुरुस्तीकाम पूर्ण करून तक्रारींचा निपटारा लावला. परंतु, वादळानंतर महिना लोटला तरी एमटीएनलने अद्याप काम सुरू केलेले नाही. त्यामुळे वरळीनाका परिसरातील दोनशेहून अधिक लॅण्डलाइन ग्राहक त्रस्त आहेत. याबाबत वारंवार एमटीएनएल कार्यालयात तक्रारी दाखल करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
कंत्राटदार फुरकान मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी टेलिफोन एक्स्चेंजच्या मागच्या बाजूला भूमिगत वाहिनीत बिघाड झाला आहे. सहा फुटांहून अधिक खोलीवर असलेल्या या वाहिनीतील तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी खोदकाम करावे लागेल. त्यासाठी पालिकेकडून परवानगी घ्यावी लागेल. त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, बिघाड होऊन महिना उलटला तरी एमटीएनएलने पालिकेकडे परवानाही मागितली नाही, आता पावसाळ्यात खोदकामाची परवानगी कशी मिळेल, असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला.
* वरिष्ठांचे दुर्लक्ष...
- ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने संबंधित ठिकाणी पाहणी केली असता एमटीएनएलने अद्याप कोणत्याही प्रकारचे काम हाती घेतले नसल्याचे दिसून आले. कंत्राटदार रोज नवनवी कारणे पुढे करून कामास टाळाटाळ करीत असून, एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याचे या प्रकाराकडे लक्ष नाही. कार्यकारी संचालक कार्यालयाकडून ग्राहकांना लॅण्डलाईनवर येणारे फोन मोबाइलवर डायव्हर्ट करण्याचा पर्याय दिला जात आहे. परंतु, बहुजोडणी असलेली कॉर्पोरेट कार्यालये हा पर्याय कसा स्वीकारू शकतील, असा सवाल या कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
* माहिती घेऊन पुढील कार्यवाही ऱ्या
मेजर केबल फॉल्ट असल्यास दुरुस्तीला वेळ लागतो. मेट्रोसारख्या प्रकल्पांच्या खोदकामामुळे बरेच अडथळे येतात. खोदकामासाठी परवानगी मिळवण्याची प्रक्रियाही क्लिष्ट असते. वरळीतील लॅण्डलाईन दुरुस्तीबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
- नरेंद्र गजरे, जनसंपर्क अधिकारी, एमटीएनएल, मुंबई
------------------------------