मुंबई - वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी आज सकाळी कोस्टल रोडचे काम बंद पाडले. यामुळे परिसरातील वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या ६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मच्छिमारांना तज्ज्ञांचा स्वतंत्र अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तसेच, या स्वतंत्र अहवालात ज्या तरतुदी देण्यात येतील त्या सर्व तरतुदींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे बैठकीत आयुक्तांकडून आश्वासन देण्यात आले होते. त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी दुजोरा दिला होता.
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी समुद्रातील वादग्रस्त ६ ते १० पिलर्सच्या बांधकामांव्यतिरिक्त १ ते ५ पिलर्सच्या स्पानच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती आणि मच्छिमारांनी प्रशासनावर विश्वास ठेऊन वादग्रस्त नसलेल्या बांधकामाला अडथळा निर्माण केला नव्हता. वरळीच्या मच्छिमारांनी पालिका प्रशासनाला आपला स्वतंत्र टेक्निकल रिपोर्ट सादर करून २० दिवस उलटूनसुद्धा पालिका प्रशासनाकडून याबाबत काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज सकाळी वरळीच्या संतप्त मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम बंद पाडले असल्याची माहिती स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थेचे सेक्रेटरी आणि कोस्टल रोड विरोधाचे आंदोलनकर्ते नितेश पाटील यांनी लोकमतला दिली. तसेच, जोपर्यत या रिपोर्ट प्रमाणे दोन पिलरमधील अंतर 160 मीटर ठेवण्यात येईल, अशी लेखी हमी पालिका प्रशासनाकडून मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोस्टल रोडचे काम करु देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई मनपाने मच्छिमारांच्या मागणीकडे डोळेझाक केली तर, आता मुंबईतील मच्छिमार गप्प बसणार नाहीत. प्रशासनाच्या या मनमानी आणि मच्छिमार विरोधी कार्यवाहीचे पडसाद लवकरच मुंबईच्या रस्त्यांवरही उमटणार आहेत आणि या जन-उद्रेकाला महविकास आघाडी सरकार जबाबदार राहणार आहे, असा इशाराही अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला.
स्थानिक मच्छिमार मागील २ वर्षांपासून समुद्रातील दोन पिल्लर मधील अंतर २०० मीटर ठेवण्याची मागणी करत होते. त्याला प्रशासनाकडून फक्त ६० मीटर येवढे अंतर ठेवण्यात आले आहे. मच्छिमारांना आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करावी लागणार आहे. स्वतंत्र अहवलात स्पष्टपणे नमूद केले आहे की दोन पिल्लरमधील अंतर हे किमान १६० मीटर असणे अनिवार्य आहे, अशी माहिती देवेंद्र तांडेल यांनी दिली. प्रशासनाकडून होणाऱ्या मच्छिमारांच्या पिळवणूकीला पालिका आयुक्त आणि मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.