Join us

वरळी किल्ला परिसराचा विकास पालिका आणि सरकार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:14 AM

मुंबई - वरळी किल्ला व परिसराचा विकास पुरातत्त्व संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ...

मुंबई - वरळी किल्ला व परिसराचा विकास पुरातत्त्व संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासंदर्भात बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. वरळी किल्ला विकासासाठी पुढील १० वर्षे महापालिका सांस्कृतिक कार्य विभागासोबत काम करणार आहे. वरळी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून हा किल्ला राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.

राज्यासह मुंबईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका किल्ल्याचे जतन व संवर्धन करणार आहे. या किल्ल्यावर विद्युतीकरण व प्रकाशझोत योजनेचे काम करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.