- संकेत सातोपे
मुंबई : ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या तत्कालीन मुंबई बेटाचे संरक्षण सात प्रमुख किल्ल्यांच्या आधारे होत असे. आज महाराष्ट्रातील अन्य किल्ल्यांप्रमाणेच हेही दुर्लक्षित आणि दुरवस्थेत आहेत. मात्र याला अपवाद ठरला आहे, तो केवळ वरळीचा किल्ला!
मुंबईतील अन्य किल्ले पडझड होऊन अथवा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून शेवटच्या घटिका मोजत असताना, स्थानिक कोळी बांधवांच्या जपणुकीमुळे वरळी कोळीवाड्यातील किल्ला मात्र पूर्वीच्याच दिमाखात अगदी नेटकेपणाने उभा आहे. या छोटेखानी किल्ल्याच्या कोणत्याही भागात मोकळेपणाने वावरता येते. दुर्गंधी, अस्वच्छता सोडा; साधा कागदाचा कपटाही किल्ल्यात पडलेला सापडणार नाही. काळाभोर ताशीव दगडातल्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आता शिरताच समोर एक हनुमंताचे मंदिर दिसते. त्याच्याच शेजारी लहानशी शेड करून व्यायामाचे साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे कोळीवाड्यातील तरुणांचा येथे नियमित वावर असतो. परिणामत: येथील अस्वच्छतेला आणि गैरप्रकारांना आपसूकच आळा बसला आहे.
व्यायामाद्वारे बल आणि दुर्गसंवर्धनाची अभिनव संकल्पना राबविण्याचे श्रेय डॅनी या स्थानिक मच्छीमार युवकाला जाते. डॅनी सांगतो की, ‘काही वर्षांपूर्वी या किल्ल्यातही अस्वच्छता आणि गैरप्रकार बोकाळले होते. किल्ल्यात पत्त्याचे डाव रंगत होते. स्थानिक मच्छीमारही मासे सुकविण्यासाठी किल्ल्यात येत आणि काम झाल्यावर कचरा इथेच टाकून निघून जात. मी पुढाकार घेऊन एकेकाची समजूत काढली. त्यातून अनेकदा वादाचेही प्रसंग उद्भवले. पण अखेर ग्रामस्थांना माझे म्हणणे पटले आणि बदलाला सुरुवात झाली. सर्वांत आधी आम्ही तरुण मुलं इथे येऊन व्यायाम करायला लागलो. व्यायामाचं साहित्य इथे ठेवू लागलो. त्यामुळे हळूहळू उनाड लोकांसाठी हे ठिकाण गैरसोयीचे ठरून, त्यांचे बस्तान इथून उठले. व्यायामशाळा, हनुमंताचे स्थान स्वच्छ राहावे, म्हणून लोकच प्रयत्न करू लागले आणि किल्ला पुन्हा नेटका झाला.’
वरळी कोळीवाडा या मुंबईच्या भरवस्तीत असलेला हा किल्ला ब्रिटिशकालीन मुंबईची महत्त्वपूर्ण सामरिक खूण आहे. मुंबईकरांच्या सुदैवाने आणि स्थानिकांच्या प्रयत्नाने; शासनाच्या परंपरागत दुर्लक्ष करण्याच्या धोरणाचा फटका सोसूनही तो उमेदीने उभा आहे. एकीकडे विस्तीर्ण समुद्र, त्यावरील सागरीसेतू आणि दुसरीकडे गगनचुंबी इमारतींची दाटी, अशा सगळ्या धबडग्यात उभ्या असलेल्या ऐतिहासिक मुंबईच्या या साक्षीदाराची मावळतीच्या वेळी घेतलेले भेट विशेष विलोभनीय ठरते.