वरळी हिट अँड रन प्रकरण : तपासासाठी १८ टीम, ३० ते ३५ जणांचा जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 07:05 AM2024-07-10T07:05:33+5:302024-07-10T07:05:51+5:30
वरळी हिट अँड रनप्रकरणी आतापर्यंत ३० ते ३५ जणांची चौकशी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरळी पोलिस ठाण्याच्या १० आणि गुन्हे शाखेच्या ८ टीम मिहीरच्या मागावर होत्या. शहापूरमध्ये शहा कुटुंब असल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पथक सोमवारी रात्रीच तेथे पोहोचले. मात्र मिहीर तेथे सापडला नाही. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याच्या मित्राचा फोन ऑन होताच पोलिसांच्या पथकाला अलर्ट मिळाला. त्याच मार्गावर असलेल्या वरळी पोलिसांच्या पथकाने मिहीरला अटक केली. वरळी हिट अँड रनप्रकरणी आतापर्यंत ३० ते ३५ जणांची चौकशी केली आहे.
'त्या' रात्री नेमके घडले काय?
रात्री जुहूमध्ये पार्टी झाल्यानंतर मिहीर मित्रांना बोरिवलीला सोडून साडेतीन वाजता घरी आला. घरी आल्यानंतर तो मरिन ड्राइव्हला फिरण्यासाठी चालकाला घेऊन गेला. पहाटे कावेरी नाखवा यांना त्याच्या गाडीने धडक दिली. दरम्यान, दंडाधिकाऱ्यांनी मिहीरच्या कारचा चालक बिडावतच्या पोलीस कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ केली.
आईसह दोन बहिणीही ताब्यात
• सहपोलिस आयुक्त लखमी गौतम आणि उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या देखरेखीखाली गुन्हे शाखेचे पथक मिहीर आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत होते. ते शहापूर येथे असल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने आई, दोन बहिणी आणि मित्राला ताब्यात घेतले. मिहीरने कावेरी नाखवा यांना रविवारी पहाटे धडक दिली. गाडीच्या बॉनेटला अडकलेल्या कावेरी यांना त्याच अवस्थेत त्याने सुमारे दीड ते दोन किलोमीटर फरफटत नेले. त्यानंतर, त्याच्या चालकाने कावेरी यांच्या अंगावरून दोनदा कार चालवली, अशी माहिती पुढे येत आहे.