Join us

अपघातानंतर वडिलांना फोन, अन् नॉट रिचेबल; वरळी प्रकरणातील आरोपीची धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 5:57 AM

मिहीरची रात्री मित्रांसह दारूपार्टी, सकाळी अपघातानंतर प्रेयसीच्या घरी

मुंबई : वरळीतील हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने अपघातानंतर कार वांद्रे, कलानगर  परिसरात सोडली आणि  वडील राजेश शाह यांना फोन करून घटनाक्रम कथन केला. त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद केल्याची माहिती पुढे येत आहे.  तो सकाळी ८ वाजेपर्यंत गोरेगावमध्ये प्रेयसीच्या घरी थांबला. बातम्या सुरू होताच तेथून मित्राच्या घरी जातो सांगून निघाला. पोलिसांनी त्याच्या प्रेयसीचाही जबाब नोंदवला आहे. अपघातग्रस्त वाहन तपासणीसाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले आहे. पोलिस मिहीरचा ठावठिकाणा शोधत आहेत. 

मित्रासोबत दारूपार्टी 

आरोपी मिहीर याने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह मद्यप्राशन केले. त्यांचे बिल १८ हजार ७३० रुपये झाले. ते त्याच्या मित्राने भरले. रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. त्यानंतर तो गोरेगावला घरी गेला. त्याने आपल्या कारचालकाला लाँग ड्राइव्हला जायचे असल्याचे सांगितले. कार घेऊन तो पुन्हा मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला. गोरेगावला जाताना मिहीर स्वतः गाडी चालवत होता. त्याचवेळी त्याने  वरळीत नाखवा दाम्पत्याला धडक दिली. 

...तर कावेरी वाचली असती

 आम्ही दोघेही दुचाकीने घरी परतत असताना पाठीमागून जोरदार धडक बसली. मी खाली कोसळलो. माझी पत्नीही माझ्या पाठीवर आदळल्यामुळे तिला जास्त मार लागला नव्हता; मात्र चालकाने गाडीचा वेग वाढवून पत्नीला फरफटत नेले, असे वरळीतील हीट ॲण्ड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा यांनी सांगितले. 

 मी गाडी थांबविण्याची विनंती केली, पण त्याने माझे ऐकले नाही. वेळीच ब्रेक दाबला असता तर माझी पत्नी वाचली असती, असे प्रदीप नाखवा म्हणाले. 

 मासेमारी बंद असल्याने कावेरी नाखवा क्रॉफर्ड मार्केटमधून मासे घेऊन त्यांच्या भागात विकायला घेऊन येत असताना हा अपघात झाला.   नाखवा दाम्पत्या मुलगा यश नुकताच शिक्षण संपवून नोकरीला लागला आहे. त्यामुळे त्यांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला होता.  माझा मुलगा त्याच्या आईचा लाडका होता. तो कामावरून घरी आला तेव्हा त्याला आईच्या मृत्यूबाबत सांगण्याचे धाडस झाले नाही. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही प्रदीप यांनी केली.

राजकीय हस्तक्षेप नको : आदित्य ठाकरे

 वरळीत घडलेल्या हिट ॲण्ड रनप्रकरणी राजकीय हस्तक्षेप न करता आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. या प्रकरणातील राजेश शाह कोण आहे, याची तुम्ही माहिती घ्या, मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कोणी कोणत्याही पक्षात असले तरी मी या घटनेला राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

 ‘हिट ॲण्ड रन’च्या प्रकारानंतर आदित्य यांनी वरळी पोलिस ठाण्यात  जाऊन माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, या घटनेतील आरोपी चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे.  

 उलट दिशेने गाड्या चालवणे, सिग्नल न पाळणे, ट्रिपल सीट जाणे हे प्रकार मुंबईत वाढले आहेत. ते आधी नव्हते. पण आता तर  हिट ॲण्ड  रनसारखे प्रकार घडत आहेत, अशा घटना घडू न देणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन परिस्थिती सुधारावी लागेल. मुंबईच्या वाहतुकीत शिस्त आणि सुरक्षा आणावी लागेल, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :मुंबईआदित्य ठाकरेवांद्रे-वरळी सी लिंकमुंबई पोलीस