"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 01:37 PM2024-07-07T13:37:58+5:302024-07-07T13:38:55+5:30

Worli Hit And Run Case : भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे.

Worli Hit And Run Case , Aditya Thackeray's reaction we have to go beyond politics and improve the situation, accused mihir shah son of shiv sena deputy leader rajesh shah | "....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई : मुंबईतील वरळी येथून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव कारने कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. या घटनेनंतर मुंबईतील वाहतूक स्थितीबाबत चिंता व्यक्त करत, ठाकरे गटाचे आमदार अदित्य ठाकरे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही परिस्थिती सुधारायला लागेल, असे म्हटले आहे. 

कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे ५.३० च्या सुमारास कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. मुंबईतील वाहनचालकांची ड्रायव्हिंगची पद्धत आणि शिस्त यावर आम्ही सातत्याने बोलत आलो आहे. उलट दिशेने गाड्या चालवणे, सिग्नल न पाळणे, ट्रिपल सीट जाणे… सगळंच मुंबईत वाढत चालले आहे, जे आधी नव्हतं, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आता तर हिट ॲंड रन सारखे प्रकार घडायला लागलेत! अपघात करणाऱ्या त्या व्यक्तीला जरी तातडीने अटक करण्यात आली असली, तरी अशा घटना होऊच न देणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन ही परिस्थिती आपल्याला सुधारायला लागेल! मुंबईची वाहतुक शिस्त आणि सुरक्षा परत आणायला लागेल! वाहतुकीचे नियम पाळले जातील, वाहकांना शिस्त लागेल आणि चूका करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, ह्याची काळजी घ्यावी लागेल, असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, वरळीतील हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात झाला त्यावेळी राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात. पोलिसांनी आरोपीच्या मिहीर शाह याला देखील अटक केली आहे. मिहीर शाह आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Worli Hit And Run Case , Aditya Thackeray's reaction we have to go beyond politics and improve the situation, accused mihir shah son of shiv sena deputy leader rajesh shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.