Join us

मिहिरचा अटकेनंतरचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह; वरळी हिट अँड रन प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 2:07 PM

दोन दिवसांनी घेतलेल्या नमुन्यानुसार तो दारूच्या नशेत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याबाबतचे अन्य भक्कम पुरावे पोलिसांकडे असल्याचे सांगितले जात आहेत.

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचे ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दोन दिवसांनी घेतलेल्या नमुन्यानुसार तो दारूच्या नशेत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याबाबतचे अन्य भक्कम पुरावे पोलिसांकडे असल्याचे सांगितले जात आहेत.मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मिहिरने त्याच्या बीएमडब्ल्यू कारने ७ जुलै रोजी कावेरी नाखवा यांना चिरडले होते. अपघातानंतर दोन दिवसांनी मिहिरला पोलिसांनी विरार येथून बेड्या ठोकल्या. त्यावेळी तो दारूच्या नशेत आहे की नाही, यासाठी त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल आता वरळी पोलिसांच्या हाती आली असून तो नकारात्मक आहे. घटनेच्या दोन दिवसाने त्याचा अहवाल सकारात्मक येण्याची शक्यता यापूर्वीच नाकारण्यात येत होती. 

बियरचे कॅनही गाडीतून जप्त मिहिरने घटनेच्या दिवशीच जुहूच्या वाईस ग्लोबल तपास बारमध्ये व्हिस्कीचे चार मोठे पेग घेतल्यानंतर मालाडच्या साई प्रसाद बार मधून रात्री साडे तीन वाजता बिअरचे चार कॅन रिचवल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील फुटेज, बिल तसेच बियरचे रिकामी कॅनही गाडीतून जप्त केले होते. 

टॅग्स :अपघातपोलिस