Join us

बारमध्ये दारूपार्टी, नंतर लाँग ड्राइव्हवेळी रिचवल्या चार बीअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 8:40 AM

महिला गाडीच्या चाकात अडकल्याचे कळले नाही : मिहीरचा दावा

मुंबई : मित्रांसोबत जुहूतील बारमध्ये दारूपार्टीत मिहीर शहाने व्हिस्कीचे चार लार्ज पेग घेतले. पुढे मित्रांना सोडून तो घराकडे आला. तेथून गाडी बदलून बीएमडब्ल्यू घेऊन तो मरिन ड्राईव्हला लाँग ड्राईव्हसाठी निघाला. वाटेत पुन्हा त्याने चार स्ट्राँग बिअरचे कॅन खरेदी करत ते रिचवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मद्यधुंद अवस्थेत गिरगाव चौपाटी परिसरात गाडी चालवण्याचा हट्ट त्याने धरला आणि वरळीत कावेरी नाखवा यांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती मिहीरच्या चौकशीत समोर आली आहे.

शनिवारी रात्री मिहीरने जुहूतल्या ग्लोबल तापस बारमध्ये दारूपार्टी केली. तेथे मित्रांसोबत व्हिस्कीचे चार मोठे पेग प्यायला. मित्रांना बोरिवलीला सोडून साडेतीन वाजता घरी आला. तेथे मर्सिडीज ठेवून वडिलांची बीएमडब्ल्यू घेऊन तो चालकासोबत लाँग ड्राइव्हसाठी निघाला. वाटेत मालाडच्या साई प्रसाद बारमधून त्याने स्ट्राँग बिअरचे चार कॅन (प्रत्येकी ५०० मिलिलिटर) खरेदी केले. लाँग ड्राईव्हदरम्यान ते रिचवले. त्याने चालकालाही पिण्याचा आग्रह केला. मात्र, त्याने नकार दिला. पुढे मरिन ड्राइव्ह येथून गिरगाव चौपाटी येथे पोहोचताच मिहीरने गाडी चालवण्याचा हट्ट धरला. मात्र, नशेत असल्याने गाडी चालवू नको, असे चालक राजऋषी बिडावत याने सांगूनही त्याने ऐकले नाही.

मरिन ड्राइव्ह ते कलानगर

मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात निघालेल्या बीएमडब्ल्यूने नाखवा दाम्पत्याला उडविल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी साई प्रसाद बारचा वेटर राजीव सिंगचाही जबाब नोंदवला आहे. वरळी पोलिसांनी दोघांची समोरासमोर चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिहीरने गिरगाव चौपाटी ते सी लिंक लँडिंग पॉइंटपर्यंत गाडी चालवली. पोलिसांनी बुधवारी रात्री मरिन ड्राईव्हपासून कलानगरपर्यंतचा घटनाक्रम रिक्रीएट केला. नेमके कुठे काय झाले याचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. पोलिसांचे पथक मिहीरच्या तपासासाठी पालघरला आजी-आजोबांच्या घरी पोहोचले. मात्र, ते तेथे नव्हते.

ड्रायव्हरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 मिहीर शहाचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

 या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी बिडावत याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी पोलिसांची विनंती मान्य न करता बिडावतला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी