Join us  

वरळी हिट अँड रन प्रकरण : अखेर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:46 PM

शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

मुंबई : मुंबईच्या वरळी भागात गेल्या रविवारी हिट अँड रनची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी मिहीर शाहला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मिहीर शाह हा शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे अखेर शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

राजेश शाह यांच्यावर कारवाई केल्याचे एक पत्र समोर आले आहे. यामध्ये शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राजेश शाह, पालघर यांना शिवसेना उपनेता पदावरून काययमुक्त करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची रविवारी घटना घडली होती. कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा यांच्या दुचाकी गाडीला मिहीर शाह याने मागून धडक दिली. त्यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. 

हा अपघात झाल्यानंतर मिहीर शाहने घटनास्थळावरून पळ काढला, पण गाडी कलानगरमध्ये बंद पडली होती. या घटनेची माहिती  मिहीर शाहने त्याचे वडील राजेश शाह यांना दिली. त्यानंतर ती गाडी राजेश शाह यांनी अज्ञातस्थळी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि गाडीवरील पक्षाचं चिन्ह, नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच, या घटनेवरून विरोधकांकडून शिंदे गटावर टीका करण्यात येत होती.

कोण आहेत राजेश शाह? शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पालघर जिल्हाप्रमुख असलेल्या राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी केली होती. राजेश शाह यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाकडून ही कारवाई करण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या या कारवाईनंतर राजेश शाह यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांची पालघर जिल्ह्याचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच,  राजेश शाह यांनी नुकताच जिल्ह्यात कोकण पदवीधरचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीतील हेमंत सवरा यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय होते. 

टॅग्स :शिवसेनाअपघातएकनाथ शिंदे