मुंबई : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मिहीर शहाने अखेर अपघाताच्या वेळी कार चालवत असल्याची कबुली बुधवारी पोलिसांना दिली तसेच सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याचा इन्कार करणाऱ्या मिहीरने पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच हो नशेत होतो, अशी कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघातानंतर घाबरल्याने पळाल्याचेही त्याने सांगितले. मात्र, तो अजूनही बरीच माहिती लपवत असून तपासला सहकार्य करत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ओळख लपविण्यासाठी त्याने दाढी, मिशी आणि केस कापून लूक बदलला. अपघातानंतर मिहीर गोरेगावला प्रेयसीच्या घरी पळाला. तेथून बहीण पूजासह लपून राहिला. त्यानंतर शहा कुटुंब शहापूरच्या रिसॉर्टमध्ये होते. सोमवारी रात्री शहापूर येथून मिहीरची आई वीणा, बहिणी पूजा आणि किंजल यांच्यासह मित्र अवधीप यांना ताब्यात घेतले. नवीन कायद्यानुसार सर्व जबाब, तपासाचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येत आहे.
मिहीरला मंगळवारी रात्री ११:३० वाजता अटक केल्याचे दाखवण्यात आले आहे. मिहीर आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांचा जबाब आणि घटनाक्रमांत तफावत आढळून आली आहे. त्यामुळे दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
मिहीर तपासला हवे तसे सहकार्य करत नाही, असे समजते. दुसरीकडे, सीसीटीव्ही चित्रणासह अन्य पुरावे त्याच्या समोर ठेवताच अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो, अशी कबुली त्याने दिली. वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्यासह तपास अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
पोलिसांना प्रतीक्षा मिहीर आणि बिडावतच्या अहवालाची
कावेरी यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालात जास्तीच्या जखमा तसेच अनैसर्गिकपणे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, शहा आणि बिडावत है दारूच्या नशेत होते की नाही? याचा अहवाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
घटनेचे रिक्रीएशन
पोलिसांकडून दोघांना घटनास्थळी नेत त्याचे रिक्रीएशन करण्यात येणार आहे. तसेच, नवीन कायद्यानुसार ऑडिओ- व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.
... तर आजी- आजोबाही गायब
पोलिसांचे पथक मिहीरच्या तपासासाठी पालघरच्या आजी-आजोबांच्या घरी पोहोचले. तेव्हा ते देखील तेथे नव्हते.
तपास सुरू
मिहीर आणि चालकाची समोरासमोर चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी दोघांकडून नेमका घटनाक्रम समजून घेण्यात येत आहे. कुटुंबातील अन्य व्यक्तींचा नेमका सहभाग निश्चित झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल - कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपायुक्त