मुंबई : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात मिहीर शहा याने दीड किलोमीटर अंतरापर्यंत कावेरी नाखवा (४५) यांना फरपटत नेले. पुढे, कार थांबवून बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाजूला काढले. त्यांना मदत करण्याऐवजी, जागा बदलून चालकाच्या हाती कार दिली. पुढे, चालकानेही कावेरी नाखवा यांच्या अंगावरून भरधाव गाडी नेत पळ काढल्याची अंगावर काटा आणणारी माहिती सीसीटीव्हीतून समोर आली आहे. नाखवा यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
गुन्हा घडल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी राजेश शहा यांनी मुलाला पळून जाण्याच्या सूचना दिल्या तर चालक राजऋषी बिडावतला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीरच्या बीएमडब्ल्यूने प्रदीप व कावेरी नाखवा यांना धडक दिली. दोघेही बोनेटवर कोसळले. मिहीरने जोरात ब्रेक दाबताच प्रदीप डाव्या बाजूला कोसळले. तर, कावेरी यांची साडी चाकात अडकल्याने त्यांना बाजूला होता आले नाही. मिहीर व राजऋषी दोघेही वांद्रे परिसरात आले. तेथे बिडावतने राजेश शहा यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा शहा यांनी त्याला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितले. तसेच मिहीरला पळून जाण्याच्या सूचना दिल्या. मुलाला पळवून लावण्यास मदत केली म्हणून राजेश शहा यांना अटक केली आहे.
मिहीरविरुद्ध लूक आउट नोटीस जारी
मिहीर शहा अजूनही फरार असून त्याच्या तपासासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही तसेच नातेवाइकांच्या सीडीआरनुसार त्याचा शोध सुरू आहे. त्याच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
अपघातानंतर मैत्रिणीच्या घरी काढली झोप
अपघातानंतर वडिलांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहीरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीला जवळपास तीस ते चाळीस कॉल केले. मैत्रिणीचे घर गाठून तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोन तास तेथे झोप घेतली. प्रेयसीने याबाबत त्याच्या घरी फोन करून सांगताच, त्याच्या बहिणीने प्रेयसीचे घर गाठले. त्यानंतर बहीण पूजा त्याला घेऊन बोरिवलीच्या घरी गेले. तेथून घराला कुलूप लावून आई मीना आणि बहिणीसह तो फरार झाल्याचे समोर आले आहे. तसेच याबाबत आई आणि बहिणीलादेखील माहिती असल्याने त्यांनाही आरोपी करण्याची शक्यता आहे.
गाडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
गुन्हा घडल्यानंतर कार वांद्रे कलानगर येथे बंद पडली. चालक राजऋषी बिडावत याने राजेश शहा यांना फोन करून घटनेची माहिती देताच राजेशने कलानगर येथे धाव घेतली. तोपर्यंत मिहीर पळून गेला होता. राजेश यांनी टोईंग व्हॅनलाही फोन करून माहिती दिली. तसेच गाडीवरील पक्षाचे चिन्ह, नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न केला. टोईंग व्हॅन घटनास्थळी पोहोचणार त्यापूर्वी वरळी पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने कलानगर येथे पोहोचले. त्यांनी राजेशसह चालकाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. चौकशीअंती अटक केली. गाडीचा पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले.
आरोपीला फाशी देण्याची वाडकर यांची मागणी
कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या चुलत भावाच्या कन्या होत्या. घडलेल्या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत वाडकर यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.