वरळीची गृहमंत्र्यांनी ड्रोनद्वारे केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:20 AM2020-04-15T05:20:22+5:302020-04-15T05:20:32+5:30

सोशल डिस्टन्सिंगसाठी रोखण्याचा उपाय : व्हिडीओ रेकॉर्डिंगची व्यवस्था

Worli home minister surveys drone | वरळीची गृहमंत्र्यांनी ड्रोनद्वारे केली पाहणी

वरळीची गृहमंत्र्यांनी ड्रोनद्वारे केली पाहणी

Next

मुंबई : मुंबईतील कोळीवाडा, धारावी, भेंडीबाजार आदींसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांना आता आधुनिक ड्रोनची मदत मिळणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून या भागातील सोशल डिस्टन्सिंगवर नजर ठेवली जाणार आहे. मंगळवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वरळी कोळीवाड्यात ड्रोनद्वारे पाहणी आणि आवाहन करण्यात आले.

नवीन, मोठ्या ड्रोनच्या साहाय्याने लोकवस्तींमध्ये पोलीस सहजतेने व गतीने पोहोचून लक्ष ठेवू शकतील. या ड्रोनमध्ये स्पीकरची व्यवस्था असल्याने पोलीस जनतेला सूचना, निर्देशसुद्धा देऊ शकतील. यात व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा असल्याने पोलिसांना मोठी मदत होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. भारतात सरासरी दर ७६१ जनसंख्येकरिता एक पोलीस कर्मचारी उपलब्ध आहे. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये ९५०ची सरासरी आहे. सहाजिकच पोलीस यंत्रणेवर याचा मोठा ताण पडतो. अशा आधुनिक तंत्रज्ञानाची निश्चितच मदत होते, असेही ते म्हणाले.
कोरोना साथीपासून नागरिक व पोलीस दोघांनाही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. आकाशातील हे ड्रोनरूपी डोळे मुंबई पोलिसांना सामाजिक अंतर लागू करण्यात मदत करतील, असे गृहमंत्री म्हणाले. यावेळी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त (संचलन) प्रणय अशोक, पोलीस उपायुक्त (झोन ५) नियती दवे व इतर अधिकारी उपस्थित होते.

कोरोना साथीपासून नागरिक व पोलीस दोघांनाही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा त्याच दृष्टीने उचललेले पाऊल आहे.

Web Title: Worli home minister surveys drone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.