वरळीमधील रुग्ण श्रीवर्धनमध्ये पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 02:09 AM2020-04-18T02:09:42+5:302020-04-18T02:10:53+5:30
भोस्ते गाव प्रशासनाने केले सील : संपर्कातील व्यक्तींची पनवेलला रवानगी
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. ४ एप्रिल रोजी हा रुग्ण मुंबईतल्या वरळीतून आपल्या कुटुंबासह भोस्ते गावात आला होता. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेले पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
भोस्ते गावात कोरोनाचा पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे गाव सील केले आहे. गावात आढळलेला रुग्ण हा वरळी येथे आपल्या कुटुंबासह राहातो. वरळी येथे कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. सातत्याने येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने या व्यक्तीने वरळी सोडण्याचा निर्णय घेतला. ४ एप्रिल रोजी तो आपल्या कु टुंबासह श्रीवर्धन-भोस्ते या गावी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोचला. त्यानंतर काही दिवसांनी त्याला ताप आल्याने स्थानिक डॉक्टरांकडे रिक्षातून नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यावर त्याला रक्त तपासण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याच्या रक्ताची तपासणी स्थानिक पॅथोलॉजी लॅबमध्ये करण्यात आली. त्याच्या शरीरात फक्त बाराशेच पांढऱ्या पेशी होत्या, तसेच प्लेटलेट्सचे प्रमाण हे ४७ हजार होते. त्यानंतर त्याला श्रीवर्धन येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती ठिक नसल्याने त्याला तातडीने पनवेल येथे पाठवण्यात आले. तेथील डॉक्टरांच्या सल्याने एमजीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, असे डॉक्टर ढवळे यांनी सांगितले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. त्यानंतर १२ एप्रिल रोजी स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनच्या कालावधीत तो रुग्ण गावात आला कसा असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भोस्ते गाव सील करण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रांताधिकारी, पोलीस, ग्रामपंचायत, डॉक्टरांचे पथक तैनात आहे. गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
पोलीस, आरोग्य यंत्रणेसमोर आवाहन
रुग्णाच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच त्या रुग्णावर उपचार करणारे स्थानिक डॉक्टर, पॅथोलॉजी लॅबचे कर्मचारी, रिक्षा चालक यांना शुक्रवारी सायंकाळी पनवेलच्या रुग्णालयात पाठवण्यात माहिती सरकारी रुग्णालयाचे डॉ. मधुकर ढवळे यांनी दिली. हा रुग्ण गावात कोणत्या नागरिकांच्या संपर्कात आला होता. याचा तपास करण्याचे आवाहन पोलीस आणि आरोग्य यंत्रणेला पार पाडावे लागणार आहे.