वरळी पोलीस वसाहतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 04:33 AM2018-07-08T04:33:53+5:302018-07-08T04:34:04+5:30

वरळीतल्या सर पोचखानवाला रोड येथील पोलीस वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. येथील काही इमारतींच्या पिलरला, स्लॅबला तडे जाऊन त्यातून पाण्याची गळती होत आहे.

Worli police colony | वरळी पोलीस वसाहतीची दुरवस्था

वरळी पोलीस वसाहतीची दुरवस्था

Next

- कुलदीप घायवट
मुंबई - वरळीतल्या सर पोचखानवाला रोड येथील पोलीस वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. येथील काही इमारतींच्या पिलरला, स्लॅबला तडे जाऊन त्यातून पाण्याची गळती होत आहे. इलेक्ट्रॉनिक वायरिंग खुल्या झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मनुष्यहानी होईल, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
वरळी पोलीस वसाहतीमध्ये ‘जे’ नावाची चार मजली इमारत आहे. इमारतीमध्ये एकूण ४० खोल्या आहेत. मात्र, १९९४ पासून येथे राहत असलेल्या रहिवाशांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. खोल्यांमधील भिंतींना तडे गेले असून, त्यातून पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे पावसाळ्यात रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून, ती मोडकळीस आली आहे. जिन्यावरील टाइल्स निखाळल्या आहेत, तसेच
ट्युबलाइट गंजल्या आहे, खिडक्यांचे ग्रील लोंबकळत्या अवस्थेत आहेत.
जिन्यांवर लाइटची सोय नसल्याने अंधारातून चढ-उतार करावा लागतो, तसेच स्लॅबला तडे गेल्याने तो कोसळण्याचा धोका असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

१९९५ साली येथे राहण्यासाठी आलो, तेव्हापासून अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. इमारतीची दुरवस्था झाल्यामुळे जीव मुठीत धरून राहावे लागते. स्लॅबला तडे गेले आहेत. स्वयंपाकगृहातील भिंतींतून पाणी गळत आहे. साबां. विभागाकडे तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. - गायत्री गजानन सुर्वे, रहिवासी.

विजेच्या वायरिंगची समस्या निर्माण झाल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जीव जाऊ शकतो. वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नाही.
- मनोहर निकम, रहिवासी.

मनुष्यबळाची कमतरता : सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यांशी या प्रकरणी संपर्क साधला असता, त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हळूहळू इमारतीची कामे करण्यात येत आहेत. एका इमारतीचे काम करायला गेल्यावर दुसºया इमारतीतील रहिवाशांना असे वाटते की, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे कामाचा वेग कमी आहे. रहिवाशांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येणार आहेत.

Web Title: Worli police colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.