लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: वरळी सी लिंकवर भरधाव कारच्या धडकेत झालेल्या अपघातात पाच जणांचा बळी गेला. चालक इरफान अब्दुल बिलकियाच्या चौकशीत मोबाइल चार्जिंगला लावत असल्यामुळे नजर चुकली आणि अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
बुधवारी पहाटे वरळी सी लिंकवरील साऊथ बॉण्डवरील पोल क्रमांक ७६ ते ७८ दरम्यान एका कारचा टायर फुटल्याने गाडी तेथील दुभाजकाला धडकली. त्याच्या मदतीसाठी सी लिंकवरील सुरक्षा सुपरवायझर चेतन कदम हे रुग्णवाहिका टोइंग व्हॅन तसेच अन्य कामगारांच्या मदतीने तेथे पोहोचले. दरम्यान, काय झाले हे पाहण्यासाठी सी लिंकवर दोन वाहने थांबली. त्याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारमालक इरफान यांना कारवर नियंत्रण करता न आल्याने त्यांच्या कारने इतर गाड्या आणि माणसांना चिरडले. इरफान विकासक असून जोगेश्वरीवरून घरी परतत असताना हा अपघात झाला. मोबाइल बंद झाल्याने चार्जिंगला लावत असताना नजर हटली आणि अपघात झाल्याचे सांगितले. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"