मुंबई :वरळीशिवडी उन्नत मार्गिकेचा तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बुधवारपासून या मार्गिकेच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या पुलासाठी लागणाऱ्या जागेच्या संयुक्त मोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या भागातील बाधित रहिवाशांचे पुनर्वसन होऊन या पुलाचे काम मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रे दिशेला जाता यावे, यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०२१ मध्ये सुरूवात झाली होती. त्यानुसार जानेवारी २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सद्य:स्थितीत या मार्गाचे केवळ ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे. बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम असल्याने या प्रकल्पाला विलंब झाला आहे.
पूर्णत्वाची अपेक्षित मुदत जानेवारी २०२६ -
१) एमएमआरडीएकडून वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या भागात दुमजली पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यानुसार स्थानिक वाहतुकीसाठी रेल्वेमार्गिकेवर एक पूल उभारला जाणार आहे.
२) त्यावरून वरळी शिवडी उन्नत मार्गिका जाईल. यासाठी जगन्नाथ भातणकर मार्गावरील प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूची १३० फुट ते १६० फूट जागेची आवश्यकता आहे.
३) यामध्ये एफ दक्षिण विभागातील ३ हजार २८९ चौरस मीटर, तर जी दक्षिण विभागातील ८ हजार १४७ चौरस मीटर क्षेत्र बाधित होत आहेत.
रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा -
३८० रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या पुनर्वसनाचा पालिका आणि एमएमआरडीए प्रत्येकी ५० टक्के खर्च उचलणार आहे. मात्र, यापूर्वी पुनर्वसनाचा अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने स्थानिक रहिवाशांकडून प्रकल्पाला विरोध केला जात होता. आता हा प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झाली असून या भागातील जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात होत आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत भागातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान या मार्गाच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला तरी प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास जाण्यास आणखी दोन वर्षांचा काळ लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्यास जानेवारी २०२६ उजाडणार आहे.