ट्रान्स हार्बर, कोस्टल रोडनंतर वरळी-शिवडी कनेक्टर कोंडी सोडवेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 06:05 AM2021-01-14T06:05:58+5:302021-01-14T06:06:26+5:30

प्रकल्प पूर्ण करणार : आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

The Worli-Shivdi connector will solve the dilemma after Trans Harbor, Coastal Road | ट्रान्स हार्बर, कोस्टल रोडनंतर वरळी-शिवडी कनेक्टर कोंडी सोडवेल

ट्रान्स हार्बर, कोस्टल रोडनंतर वरळी-शिवडी कनेक्टर कोंडी सोडवेल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर ते माहीमपर्यंत प्रस्तावित रोड सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. येथे वाहतूक नियोजन, बोगदे, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे कामही सुरू होणार असून, हे काम सुरू असतानाच पश्चिम द्रुतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविण्यासह महामार्ग हरित करण्याबाबतच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिल्या. तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्राधिकरणासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सविस्तर चर्चा करत विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. मुंबई महापालिकेकडून आता कोस्टल रोडचे काम सुरू करण्यात आले.

एमएमआरडीएकडून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम प्रगतीपथावर आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवाय या सर्व प्रकल्पांवर बारकाईने लक्ष आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
नरिमन पॉईंट-कफ परेड कनेक्टरचा विचार करता एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी सल्लागार नेमला आहे. या प्रकल्पाचे काम करताना मच्छिमारांच्या बोटीला धक्का लागणार नाही, बोटीला अडथळा निर्माण होणार नाही. कनेक्टर लोकांचा व्यवसाय आणि निवासी क्षेत्रातील प्रवास सुलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाईन जूनपर्यंत आमच्याकडे असेल, असा दावाही आदित्य यांनी यावेळी केला. या बैठकीनंतर त्यांनी कलानगर येथे सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामाची पाहणी केली. फ्लायओव्हरचे सुशोभिकरण, हरित जागेमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार करणे, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट जिल्हा या योजनांवरही आदित्य यांनी चर्चा केली.
 

Web Title: The Worli-Shivdi connector will solve the dilemma after Trans Harbor, Coastal Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.