Join us

वरळी बंदला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2016 6:05 AM

वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या मृत्यूचे पडसाद गुरुवारी वरळीत उमटले. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील

मुंबई : वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या मृत्यूचे पडसाद गुरुवारी वरळीत उमटले. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी करत वरळीकरांनी पुकारलेल्या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.२२ आॅगस्ट रोजी खारमधील एस.व्ही. रोडवरील पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या शिंदे यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्याचे वरळी परिसरात तीव्र पडसाद उमटले. जनतेतून हल्लेखोरांना शिक्षा झालीच पाहिजे, असा आवाज उठला. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हादेखील संतप्त महिलांनी त्यांना घेराव घातला. शिवाय हल्लेखोराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी गुरुवारी बंदची हाक दिली.वरळीकरांनी या बंदला गुरुवारी सकाळपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला. वरळी नाक्यासह शिंदे कुटुंबीय वास्तव्य करत असलेल्या परिसरात सकाळपासूनच शुकशुकाट होता; शिवाय येथील दुकानेही दुपारपर्यंत बंद होती. परिणामी, व्यवहार ठप्प झाले होते. महत्त्वाचे म्हणजे वरळी नाक्यापासून लोअर परेल आणि करी रोडपर्यंत दररोज सुरू असणारी शेअरटॅक्सी सेवाही बंद होती. शेअर टॅक्सीचालकांनीही बंदमध्ये सामील होत हल्लोखोरांना कडक शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, शिंदे वास्तव्यास असलेल्या वरळी येथील पोलीस वसाहतीत सकाळी एकत्र आलेल्या महिला वर्गाने ‘मूक मोर्चा’साठी तयारी केली होती. परंतु घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी महिलांना ‘मूक मोर्चा’ काढू नये, अशी विनंती केली. पोलिसांच्या या विनंतीला मान देत येथे उपस्थित तब्बल दीडशे ते दोनशे महिलांनी मूक मोर्चाचा निर्णय मागे घेतला. वरळी पोलीस वसाहतीत विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)डबेवाल्यांकडूनही आदरांजलीमुंबईच्या डबेवाल्यांनी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना लोअर परेलच्या पुलावर आदरांजली वाहिली. डबेवाल्यांच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या वाहतूक पोलिसांचे कायमच सहकार्य मिळत असते. शिंदे कुटुंबीयांच्या दु:खात सर्व डबेवाले सहभागी झाले होते.