महाराष्ट्र निवडणूक 2019: बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांना मिळाली इतकी मतं; डिपॉझिट होणार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 05:44 PM2019-10-24T17:44:00+5:302019-10-24T17:46:37+5:30
Maharashtra Election Result 2019: दुसरीकडे या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना किती मते मिळतील यासाठी उत्सुकता ताणली होती.
मुंबई - शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत असलेल्या वरळी मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दुसरीकडे या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले यांना किती मते मिळतील यासाठी उत्सुकता ताणली होती. पहिल्या फेरीअखेर शून्यावर असलेल्या बिचुकले यांनी आतापर्यंतच्या मोजणीत ७८१ मतं मिळवली आहेत. त्यापैकी ईव्हीएम मशीनद्वारे ७७६ तर पोस्टल ५ मतं मिळाली आहेत. वरळी मतदारसंघातून ठाकरे घराण्याचा सदस्य पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते असे आदित्य ठाकरे ८९२४८ मतांनी विजयी ठरले आहेत. त्यापकी८८९६२ मतं ईव्हीएम मशीनद्वारे तर २८६ मतं पोस्टल मतदानातून मिळाली आहेत.
मुंबईतील वरळी मतदारसंघाच्या निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्याचवेळी बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र, बिचुकले यांना ७८१ मतं मिळाली असून त्यांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली आहे. मजमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीअखेर मतांचा भोपळाही न फोडणाऱ्या बिचुकले यांना अंतिम फेरीअखेर ७८१ मते मिळाली आहेत. दरम्यान, वरळी मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरे यांना विजयी आघाडी मिळाली आहे. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच आदित्य ठाकरे यांनी आघाडी घेतली होती. ती आतापर्यंतच कायम होती.
कशी जप्त केली जाते अनामत रक्कम?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी १/६ (१६.६%) टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला. तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते.