वरळी डेअरीचा भूखंड नाइटलाइफसाठी हडपणार - आशिष शेलार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:12 AM2020-03-07T00:12:09+5:302020-03-07T00:12:17+5:30
तिथे नेमके काय काय येणार आणि पुढे काय घडणार याकडे लक्ष ठेवावे लागेल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई : आरे डेरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याच्या घोषणेवर भाजपने प्रश्नचिन्ह उभारले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी या निर्णयावरच शंका व्यक्त केली आहे. या जागेवर अनेकांचा डोळा होता. त्यामुळे तिथे नेमके काय काय येणार आणि पुढे काय घडणार याकडे लक्ष ठेवावे लागेल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईतील चार एकरातील महापौर बंगल्याचा भूखंड घेतला, आता १४ एकर वरळी डेरीचा भूखंड नाइटलाइफसाठी हडप करणार! २२५ एकरातील महालक्ष्मी रेस कोर्सवरपण यांची नजर आहेच. मुंबईकरांचे भूखंड खाणे हेच का यांचे पर्यावरण प्रेम? असा थेट सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर केला आहे. तसेच, मुंबईकरांसाठी 00,00,000 करोड, बारामतीकरांच्या संस्थांनाच अनुदानाचा जोर, असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री मुंबईकर आणि अर्थसंकल्प मात्र बारामतीकर. पुरवणी मागण्यांप्रमाणे अर्थसंकल्पातही ‘मुंबई कमजोर आणि बरामतीवर जोर’ असल्याचा आरोपही शेलारांनी केला. मराठी भाषा भवनाची कोरडी घोषणा करण्यात आली. ना जागा दिली, ना निधी दिला. एशियाटिकलाही केवळ अनुदानाची आस दाखवली. मराठी भाषा विभागासाठी ठोस असे काही दिले नाही, असे म्हणतानाच दिसले तुमचे मराठीचे बेगडी प्रेम, असा टोलाही त्यांनी मारला.