मुंबई : महिला आणि बालविकास विभागाकडून ६ वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाड्यांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या तयार पोषण आहारात अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर येथील दोन वर्षीय बालकाची आई प्रियांका बामणे यांनी शुक्रवारी टेक होम रेशन म्हणजेच टीएचआरच्या पाकिटांतील पोषण आहारातून खिचडी बनविली, तेव्हा त्यांना त्यात अळी आढळली.
याबाबत बामणे यांनी सांगितले की, या पाकिटातील भात ताटात घेऊन पाखडला आणि शिजवण्यासाठी ठेवला. या पाकिटात तांदळासोबत जिरे, मोहरी, हळद हे पदार्थ असतात. मात्र, खिचडी शिजल्यानंतर बाळाला भरवण्यासाठी ताटात घेतल्यानंतर त्यामध्ये अळी दिसली.
यानंतर मी अंगणवाडीच्या पालकांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर त्याबाबत माहिती दिली आणि फोटोही पोस्ट केले. अंगणवाड्यांमधून बालकांच्या संपूर्ण पोषणासाठी खिचडी, लापशीसह वेगवेगळी कडधान्ये असलेली तयार पाकिटातील आहार बालकांना आणि गरोदर तसेच स्तनदा मातांना दिला जातो. मात्र, अनेकदा दोन महिन्यांपूर्वीची पाकिटे दिली जातात, असे महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे टीएचआरची जुनी पाकिटे देणे ताबडतोब बंद करा. त्याऐवजी केळी किंवा ताजा शिजवलेला आहार द्या, तसेच सदोष आहार पुरविणाऱ्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड करा, अशी पालकांची मागणी आहे.
विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी निकृष्ट टीएचआर बंद करा या मागणीसाठी अनेक आंदोलने केली, अनेक निवदने दिली. मात्र, काहींच्या फायद्यासाठी पालकांच्या माथी हा निकृष्ट आहार मारला जात आहे. या गाेंधळात अंगणवाडी सेविका त्रासल्या आहेत. पोषण ट्रॅकर दोन-तीन दिवस चालत नाही. सरकारने बालकांना स्वच्छ आणि पोषक आहार मिळावा, हे पाहिले पाहिजे. शुभा शमीम, अंगणवाडी कर्मचारी संघटना
आहारात अळी आढळलेल्या प्रकाराची दखल एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेली आहे. पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अरुणा लोंढे, विभागीय एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी