पाकच्या तुरुंगात असताना पत्नी अन् मुलीच्या काळजीने अतीव दुःख; खलाशाने कथन केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 07:44 PM2023-05-18T19:44:52+5:302023-05-18T19:45:05+5:30
पाकच्या कैदेतील अनुभव स्वगृही परतलेल्या जयवंत जाना पाचलकर यांनी ‘लोकमत’कडे कथन केले
अनिरुद्ध पाटील
बोर्डी :पाकिस्तानातील तुरुंगात असताना तलासरीतील घरी असलेली मुलगी आणि पत्नीच्या काळजीने अतीव दुःख व्हायचे, मात्र आम्ही काहीच करू शकत नव्हतो, असे पाकच्या कैदेतील अनुभव स्वगृही परतलेल्या जयवंत जाना पाचलकर यांनी ‘लोकमत’कडे कथन केले. दरम्यान, पाकिस्तानने पकडल्यानंतर गुजरातचे रहिवासी असलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना सरकार प्रतिदिन ३०० रुपयांची आर्थिक मदत करते, मग महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील खलाशांच्या कुटुंबांबाबत हे धोरण का अवलंबत नाही, असा सवाल त्यांनी शिक्षा भोगत असलेल्या खलशांच्या वतीने उपस्थित केला आहे.
पाकिस्तानने पहिल्या टप्प्यात सुटका केलेल्या भारतीय खलाशांमध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरीतील एकूण पाच खलाशांचा समावेश होता. २ जूनला दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानच्या कैदेतून राजेश बाबू वळवी (वय ३३, वरवाडा, गुंदनपाडा), सुरेश रत्ना हरपले (उपलाट, हरपलपाडा) तसेच राजेश सावला वळवी (४५), नवीन सावला वळवी(२८), संदीप प्रभू हरपले (१९, तिघेही रा. अनवीर, डोंगरीपाडा) अशा पाच खलाशांची मुक्तता होणार असून ते सर्व तलासरी तालुक्यातील आहेत. प्रशासनाच्या वतीने त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
दरम्यान, स्वगृही परतलेल्या जयवंत जाना पाचलकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पाकच्या तुरुंगापर्यंतचा प्रवास आणि तेथील परिस्थिती सांगितली. भाऊचा धक्का येथे १५ वर्षे खलाशी म्हणून काम केले, मात्र पैसे कमी मिळत असल्याने गुजरातच्या मासेमारी बंदरावर जाण्याचा निर्णय घेतला. मुलगा जितेश हा चौथी इयत्तेनंतर शाळा सोडून गाव धुंडाळत होता.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मर्यादित संधी तसेच कमी मजुरीमुळे २०१९ च्या मासेमारी हंगामासाठी त्याला सोबतीला घेऊन पहिल्यांदाच गुजरात गाठले. डिसेंबर महिन्यात तिथल्या मंगलोर बंदरातून खोल समुद्रात मासेमारीला गेले असता या बोटीला पाक हद्दीत शिरकाव केल्याच्या कारणास्तव तेथील मेरिटाइम सिक्युरिटी बोर्डकडून ४ डिसेंबरला पकडून, ६ डिसेंबर रोजी लांडी तुरुंगात ठेवले. त्यावेळी मुलासह एकत्र राहण्याची विनंती केल्यावर त्यास मान्यता मिळाली.
१०० हारांचे मिळायचे एक हजार रुपये
चांगली वागणूक असलेल्या कैद्यांना कोणताही त्रास दिला जात नसल्याने आमची ओढाताण झाली नाही. तेथे सकाळच्या नाश्त्याला एक चपाती, तर दुपार व रात्रीच्या जेवणात दोन चपात्या व वरण दिले जात होते. तुरुंगात महिला परिधान करीत असलेल्या गळ्यातील मोत्यांचे हार करण्याचे काम देण्यात आले. १०० हारांचे एक हजार रुपये मिळायचे. तेथे स्वतः जेवण शिजवण्याची मुभा असल्याने त्या पैशांतून स्वयंपाक बनवत होतो, असे त्यांनी सांगितले.