चिंताजनक! महिन्याभरात तीन तरुणांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:22 PM2018-12-25T15:22:15+5:302018-12-25T15:29:40+5:30
क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आला असताना गावदेवी पॅकर्स या संघातून फलंदाजी करत असलेला वैभव केसरकर या तरुणाला फलंदाजी करताना अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याने फलंदाजी सोडून क्षेत्ररक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु छातीत दुखणे कमी झालं नाही. त्यामुळे त्याला डाव अर्धवट सोडावा लागला आणि तो तसाच बाहेर जाऊन एका खुर्चीवर बसला.
मुंबई - भांडुपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका क्रिकेट टूर्नामेंटमध्ये वैभव केसरकर या 24 वर्ष तरुणाचा क्रिकेट खेळताना दुर्दैवी मृत्यू झाला. 23 डिसेंबर रोजी भांडुपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत ही दुर्दैवी घटना घडली. क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आला असताना गावदेवी पॅकर्स या संघातून फलंदाजी करत असलेला वैभव केसरकर या तरुणाला फलंदाजी करताना अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याने फलंदाजी सोडून क्षेत्ररक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु छातीत दुखणे कमी झालं नाही. त्यामुळे त्याला डाव अर्धवट सोडावा लागला आणि तो तसाच बाहेर जाऊन एका खुर्चीवर बसला. परंतु, छातीत दुखणं न थांबल्यामुळे त्याला जवळच असलेल्या भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी ईसीजी काढताच वैभवला कार्डियाक अटॅक आल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. सत्येन भावसार यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून वैभव हा टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये भांडुप तसेच आसपासच्या परिसरातील विविध संघांतून खेळत होता. हल्लीच तो त्याच्या कुटुंबियांसहीत दिव्याला राहण्यास गेला होता. परंतु क्रिकेटच्या वेडापायी त्याची भांडुपशी नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे त्याच्या अचानक एक्झिटमुळे त्याच्या कुटुंबीयांसहित मित्रांना देखील धक्का बसला आहे मुंबईत महिनाभरात घडलेल्या या तिसऱ्या घटनेने तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्यास बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.कामाचा अतिताण तसेच वाढत चाललेलं फास्ट फुड कल्चर, जेवणाच्या अनियमित वेळा, अनियमित व्यायाम यामुळे तरुण वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचं डॉ. भावसार यांनी मत व्यक्त केलं आहे. अलीकडेच सीएम चषक या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेदरम्यान अनिता शर्मा (वय 12 वर्ष) नावाच्या मुलीचा मृत्यू झाला. सगळ्यांच्या देखत कांदिवलीत स्टेजवर हा प्रकार घडला. तर गेल्या आठवड्यात विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना 20 वर्षीय जीबीन सनी या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दुर्दैवी! सीएम चषक स्पर्धेदरम्यान 12 वर्षीय तरुणीचा मृत्यू
Video : धक्कादायक! सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू