चिंताजनक! मुंबईतल्या ट्रॅफिकने घेतला रुग्णाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 10:46 AM2018-08-28T10:46:14+5:302018-08-28T10:54:16+5:30
वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रोसारख्या प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही काळापासून मुंबईतील ट्रॅफिकची समस्या गंभीर झाली आहे.
मुंबई - वाढलेली वाहनांची संख्या आणि मेट्रोसारख्या प्रकल्पाच्या कामांमुळे गेल्या काही काळापासून मुंबईतील ट्रॅफिकची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांचा तासनतास खोळंबा होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने वेळीच रुणालयाता पोहोचू न शकल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत मरोळ नाका परिसरात घडली आहे.
मोहम्मद खान असे ट्रॅफिकमध्ये रिक्षा खोळंबल्याने वेळीच उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 25 ऑगस्ट रोजी अंधेरी येथे राहणारे मोदम्मद खान यांच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीय त्यांना रिक्षातून रुग्णालयात घेऊन निघाले. मात्र वाटेत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक असल्याने त्यांचा बराच काळ खोळंबा झाला. त्यामुळे मोहम्मद खान यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत दरम्यान ते रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच काही काळ आधी रुग्णालयात आणले असते तर त्यांचा जीव वाचवणे शक्य झाले असते, असेही डॉक्टरांनी सांगितले.
जर वाटेत ट्रॅफिक जाम नसता तर आपण पाच मिनिटांत रुग्णालयात पोहोचता आले असते आणि आपल्या भावावर वेळीच उपचार झाले असते, असे मत मोहम्मद खानचा भाऊ अस्लम खान याने व्यक्त केले. ट्रॅफीक नसता तर माझ्या भावाला वेळीच रुग्णालयात दाखल करता आले असते, अशी भावना मोहम्मद खानटाचा भाऊ अस्लम खान याने व्यक्त केले.
तसेच मोहम्मद खान यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना पत्र लिहून ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यास सांगितले आहे. " यासंदर्भात मी सहार पोलिसांना पत्र लिहिले आहे. तसेच मरोळ नाका येथ होत असलेल्या चुकीच्या वाहकीला आळा घालण्याची विनंती केली. नियमित ट्रॅफिकबरोबरच मेट्रोचे काम आणि वाहनांच्या रांगामुळे अधिक वाहतूक कोंडी होत आहे. तसेच जवळच असलेल्या पेट्रोलपंपावर सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे ट्रॅफिकमध्ये भर पडत आहे."असे मोहम्मद खान यांच्या भावाने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.