राज्यात १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग; मागील काही दिवसांत संसर्गाचा आलेख चढता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:29 AM2020-07-19T01:29:26+5:302020-07-19T01:29:36+5:30
राज्यात एक महिन्यापूर्वी १८ जून रोजी नवजात ते १० वर्षांपर्यंतच्या ३,८६६ बालकांना कोरोना झाला आहे.
- स्नेहा मोरे
मुंबई : राज्यात बालकांना होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. राज्यात १० हजार ६३९ बालकांना कोरोना झाला आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.७६ टक्के आहे. त्यामुळे आता चार महिन्यांनंतर ही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात एक महिन्यापूर्वी १८ जून रोजी नवजात ते १० वर्षांपर्यंतच्या ३,८६६ बालकांना कोरोना झाला आहे. तर १८ मे रोजी हे प्रमाण १,०५९ इतके होते. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये जास्त आरोग्याच्या समस्या नसतात. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यांची फुप्फुसेही चांगल्या स्थितीत असतात. त्यामुळे त्यांचे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.
महापालिकेच्या ‘कॉन्प्रिहेंशन थॅलेसेमिया केअर पीडियाट्रिक डर्मेटोलॉजी आँकोलॉजी अॅण्ड बीएमटी सेंटर’च्या संचालक डॉ. ममता मंगलानी म्हणाल्या, सर्वाधिक मुले लक्षणरहित असतात. अभ्यासानुसार, बीसीजी, एमएमआर, पोलिओ लसीमुळे त्यांना दुप्पट रोगप्रतिकारक शक्ती मिळते. आतापर्यंत जी बालके बाधित झाली त्यांच्यात लक्षणे तितकी गंभीर नव्हती. पण इतरांना त्यांच्यापासून संसर्ग होऊ शकतो, ही बाब दुर्लक्ष करून चालणार नाही.
कोरोनाग्रस्त बालकांची संख्या
कालावधी रुग्णसंख्या टक्केवारी
१८ जुलै १०,६३९ ३.७६
१८ जून ३,८६६ ३.४२
१८ मे १,०५९ ३.४६