मुंबई : राज्यभरात मंगळवारी ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत. १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुणे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलडाणा येथील आहेत.
राज्यात मंगळवारी एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,३३१ नमुन्यांपैकी ५,७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
२३ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये निदान
कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खासगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. त्यातील खासगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत.भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १४५६
कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडून कोविड-१९ च्या रोगाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी ‘लॉकडाउन’चे पालन होत नसल्याने नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. चिंताजनक बाब म्हणजे संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक असे भागही वाढत आहेत. मंगळवारी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले नवीन १०१ रुग्ण आढळले असून कोविड-१९ इंडिया ओआरजी या अधिकृत वेबसाइटनुसार भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४५६ झाली असून आतापर्यंत ४७ जण दगावले आहेत.
आसाम आणि झारखंडपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्या राज्यांत नवे रुग्ण समोर आले आहेत. यात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर राज्यांतील रुग्णांचा समावेश आहे. देशभरातील २९ राज्यांत कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार बघता देशाच्या प्रत्येक भागात तपासणी केंद्रांची संख्या वाढविण्याचे आवाहन देशभरातील दोनशेहून अधिक शास्त्रज्ञांनी सरकारला केले आहे. कोविड-१९ संबंधित बातम्या आणि अद्ययावत माहिती देण्यासाठी माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने मंगळवारी एक टिष्ट्वटर हॅण्डल सुरू केले आहे.