पहाटेपासून केव्हाही करा गणेशाची पूजा - दा. कृ. सोमण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 02:09 PM2023-09-16T14:09:53+5:302023-09-16T14:10:13+5:30
Ganesh Mahotsav: भाद्रपद शुद्ध चतुर्थी जवळ आल्याने गजाननाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. चतुर्थीच्या गणेशाच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा केली जाते. हि पूजा कशी करावी, काय करावे, काय करू नये याबाबत अनेकांच्या मनात शंका असते.
मुंबई : भाद्रपद शुद्ध चतुर्थी जवळ आल्याने गजाननाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. चतुर्थीच्या गणेशाच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा केली जाते. हि पूजा कशी करावी, काय करावे, काय करू नये याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. यावर टाकत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आणि उद्योजक जयेंद्र साळगावकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यामुळे भक्तांच्या मनातील शंका नक्कीच दूर झाल्या असतील.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चढत्या सूर्याला दुपारी १२ वाजण्यापूर्वी केव्हाही गजाननाची पूजा करावी. यासाठी मुहूर्त नसतो. आज धकाधकीच्या जीवनात गुरुजींची उपलब्धता नसते. अशावेळी स्वत:च गणेशाची पूजा करता यावी यासाठी आम्ही ॲप आणले, ज्याचा उपयोग भारतासोबत परदेशातही होत आहे. पूजेकरिता जमेल तितके नैसर्गिक साहित्य वापरावे. पर्यावरणाला हानीकारक सजावटीचे साहित्यही टाळावे. गणेशाला आवडणारे पदार्थ बनवावेत. बाहेर काही नवीन आले म्हणून ते आणू नये. कृत्रिम रंग आणि बनावट माव्यामुळे शरीराला त्रास होईल असे खाद्यपदार्थ आणू नयेत. घरीच प्रसाद करून गणेशाला नैवेद्य दाखवावा. याचा प्रकृतीलाही त्रास होणार नाही. हे भक्तांनी कायम लक्षात ठेवावे.
- जयेंद्र साळगावकर,
उद्योजक
गणपती किती दिवस ठेवावा?
एक दिवसात समाधान होत नाही म्हणून दीड दिवस गणपती ठेवतो. गणपतीची मूर्ती किती दिवस ठेवावी याबाबत शास्त्रात किंवा ग्रंथामध्ये काही लिहिलेले नाही. पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस किती दिवस गणपती ठेवायचे ही आपल्या मनाची समजूत आहे. शास्त्रात त्याच दिवशी विसर्जन करावे असे सांगितले आहे.
गणेशाच्या पूजेसाठी गुरुजीच हवेत असे नाही. चतुर्थीच्या दिवशी पहाटेपासून दुपारपर्यंत पूजा करता येते. त्यानंतरही केली तरी चालते. केवळ कर्मकांड म्हणून गणपतीची पूजा करू नये. मूर्ती लहान असली तरी भक्ती मोठी हवी. पूजादी द्रव्ये कमी-जास्त असली तरी चालते. पुस्तकातील यादीनुसार सर्व सामान मिळाले नाही तरी, जे सामान मिळेल त्याने पूजा करावी. षोडशोपचार नसेल जमत, तर पंचोपचार पूजा करा. श्लोक म्हणता आले नाहीत आणि गंध, फूल, अक्षता वाहून नमस्कार करून आरती केली तरी पूजा पावन होते.
- दा.कृ. सोमण, पंचांगकर्ते