मुंबई - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात कंगनाच्या विधानाचं समर्थन केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. तसेच, गोखले यांनी राजकीय भूमिकांवरही भाष्य केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्यांच्यावर टीका केली. मराठमोळा परफेक्शनिस्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही एका वाक्यातून त्यांच्यावर निशाणा साधला. आता, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही त्यांच्या हा देश भगवा आहे, या विधानावरुन त्यांना चांगलंच सुनावलंय.
कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. तसेच, मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अभिनेता विक्रम गोखलेंना प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले विक्रम गोखले
आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही, असे गोखले यांनी म्हटले. तर, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे, ते सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहेत.
ब्राह्मण महासंघातर्फे गोखलेंचा सत्कार
ब्राह्मण महासंघातर्फे रविवारी विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपने शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद दिले असते तर काय बिघडले असते. हे पद दिले नाही, ही आमची चूक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे मान्य केले. जनतेला विश्वासात घेतले पाहिजे. लोकांना फसवू नका अन्यथा लोक शिक्षा करतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
कंगनाच्या मताशी समहत
स्वातंत्र्य भीक मागून मिळाले, या कंगना रनौतच्या मताशी मी सहमत आहे. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, तर ते भीक मागून मिळाले.
महागाई मोदींनी वाढवली का?
महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का? अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी १० हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहीत आहे का?, असा सवालही त्यांनी केला.