वाह रे घोटाळा... वनरक्षक परीक्षेत ५४ मार्क अन् तलाठी परीक्षेत २०० पैकी २१४
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:52 PM2024-01-06T22:52:10+5:302024-01-06T23:23:26+5:30
तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती माध्यमांतून समोर आली होती
राज्य सरकारने मेगा भरतीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, सरळसेवा भरतीच्या जाहिराती निघून सदर पदांसाठी परीक्षाही घेतली जात आहे. नुकतेच, वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी निघालेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेती घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
तलाठी भरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती माध्यमांतून समोर आली होती. तर, या परीक्षांच्या भरतीसाठी मोठा घोळ असून संबंधित परीक्षा घेणाऱ्या एजन्सींकडून हे टेंडर काढून घेण्याची मागणीही उमेदवारांकडून होत आहे. त्यातच, नुकतेच तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हाती आला असून या परीक्षेत एका उमेदवाराला २०० पैकी तब्बल २१४ मार्क पडल्याने या परीक्षा व तपासणीतील भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे. त्यानंतर, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने याकडे शासनाचे लक्ष वेधले असून, याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशीची मागणी केली आहे.
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची… pic.twitter.com/o7MDlMVJuM
— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) January 6, 2024
''हे दोन निकाल पाहा, एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त १५ एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये ५४ मार्क आणि तलाठी मध्ये २०० पैकी २१४ मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. ९९% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून होत आहे.
या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे, यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार, इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार, असे म्हणत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे.