मुंबई/पुणे - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत. सध्या, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या दिल्लीतही आवाज उठवत आहेत. दरम्यान, या व्हिडिओवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत कौर यांच्यासह मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र सोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना चुलीवर भाकरी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण, भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या राणा यांनी चुलीवर स्वयंपाक का केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेटीझन्सने याचा संदर्भात इंधन दरवाढीविरोधात जोडला आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलं नाही. पण, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनीही हा व्हिडिओ शेअर करत महागाईमुळेच नवनीत कौर चुलीवर स्वयंपाक करत असल्याचं म्हटलंय. गॅस महाग झाल्यामुळे खा. नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदारदेखील महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!
ट्विटरवरुन शेअर केला व्हिडिओ
ट्विटरवर नवनीत कौर यांच्या नावाने एक अकाऊंट आहे. ज्या अकाऊंटवरुन त्यांच्या संदर्भातील बातम्या आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते. त्या अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच, कॅप्शनही देण्यात आलं आहे. 'खासदार नवनीत राणा संसदेच्या अधिवेशनात जनतेचा आवाज उठवत आहेत. तर, शनिवारी व रविवारी अमरावती येथे कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुटुंबीयांसाठी जेवण बनवत आहेत', असा आशय या व्हिडिओसह लिहिण्यात आला आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांचा व्हिडिओ पाहून बहिणाबाई चौधरी यांच्या कांव्यपक्ती आठवल्याशिवाय राहणार नाही. अरे संसार संसार.. जसा तवा चुल्ह्यावर, आधी बसती चटके, मग मिळते भाकर.... या ओळी निश्चित आठवणीत येतील.