वाह रे वा... खर्च संस्थांचा अन् प्रसिद्धी पालिकेतील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 12:00 AM2022-03-06T00:00:46+5:302022-03-06T00:02:17+5:30
मीरा भाईंदर महापालिकेचे मीनाताई ठाकरे सभागृह व मंडई लगत पालिकेचे बगिच्यासाठी आरक्षण क्रमांक २३० आहे
मीरारोड - मीरारोडच्या मीनाताई ठाकरे सभागृहा लगत असलेल्या पालिकेच्या आरक्षणात जपानी मियावाकी पद्धतीने ग्रीन यात्रा व सोनी म्युझिक ह्यांनी स्वखर्चाने १० हजार रोपांची लागवड केली आहे . परंतु महापालिकेने मात्र प्रसिद्धीपत्रकात दोन्ही संस्थेच्या एकही पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख न करता लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या नावांची मात्र जंत्रीच दिली आहे . त्यामुळे आयजीच्या जीवावर बायजीची प्रसिद्धी अशी चर्चा होत आहे .
मीरा भाईंदर महापालिकेचे मीनाताई ठाकरे सभागृह व मंडई लगत पालिकेचे बगिच्यासाठी आरक्षण क्रमांक २३० आहे . त्या आरक्षणातील सुमारे अर्धा एकर क्षेत्रात मियावाकी ह्या जपानी पद्धतीने शहरी वन विकसित केले जाणार आहे . ग्रीन यात्रा आणि सोनी म्युझिक ह्या दोन संस्थांनी यासाठी सर्व खर्च उचलला असून पालिकेला १० हजार रोपे दिली आहेत. दरम्यान दोन महिन्या पूर्वी लागवड केलेल्या ह्या रोपांचे मियावाकी उद्यान विकसित होण्यास आजून काही वर्ष जाणार आहेत . झाडे मोठी झाल्या नंतर शहरी जंगल म्हणून ओळख होणार आहे .
तसे असताना शनिवारी ह्या रोप लागवडीचे लोकार्पण केल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे . त्यासाठी छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला होता . त्या मध्ये पालिकेचे पदाधिकारी , नगरसेवक व अधिकारी यांच्या नावांची मांदियाळीच देण्यात आली आहे . परंतु ज्या संस्थांनी १० हजार रोपे मोफत दिली त्या संस्थांच्या उपस्थितीत असलेल्या एकही पदाधिकारी वा संबंधित यांचे नाव पालिकेने प्रसिद्धी पत्रकात दिलेले नाही .
शहरातील असलेली नैसर्गिक झाडे व निसर्ग वाचवण्याची गरज प्राधान्याने आहे . त्यामुळे महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांनी नैसर्गिक वन आहे ते आधी टिकवले पाहिजे . त्याच सोबत अश्या मियावाकी पद्धतीने नागरी वस्त्यां मध्ये उद्यान विकसीत करण्याचा प्रयत्न आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत .
शहरी जंगल विकसित होणार
दोन महिन्या पूर्वी सदरची रोपे या ठिकाणी लावण्यात आली असून एका मीटर क्षेत्रात ३ रोपे प्रमाणे १० हजार रोपे लावली आहेत . वर्षभरात ह्या रोपांची उंची ६ ते ८ फूट होईल . त्यात भारतीय प्रजातीची झाडे तसेच औषधी वनस्पती लागवड केली असल्याचे उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम यांनी सांगितले .