मुंबई : दोन वर्षांपूर्वी गुंडाळण्यात आलेला पर्जन्य वाहिन्यांच्या प्रकल्पाला पुनर्जीवित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अंधेरी भुयारी मार्ग येथे सूक्ष्म बोगदा टाकून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. मात्र यासाठी तब्बल १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला हा प्रकल्प महागात पडण्याची शक्यता आहे.फेब्रुवारी २०१८ मध्ये पर्जन्य वाहिनी प्रकल्पासाठी एस. व्ही. मार्गावर दोन किलोमीटरचा पट्टा खणण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये शंभर मीटर पट्टा या वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आला. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी या प्रकल्पाची गरज असल्याचा युक्तिवाद महापालिकेने केला होता.मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी हा प्रकल्प अनावश्यक असल्याने बासनात गुंडाळला. कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा पावसाचे पाणी उपसण्यासाठी उच्च क्षमतेचे पंप बसवण्याची शिफारस मेहता यांनी केली होती. परंतु, पुन्हा या प्रकल्पावर काम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकप्रतिनिधींच्या भुवया उंचावल्या आहेत....तर निधीची चणचण भासणार!महापालिकेला या आर्थिक वर्षातील निश्चित उत्पन्नाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात बचतीचा मार्ग महापालिका प्रशासनाने अवलंबला आहे. अशा वेळी अनावश्यक ठरवलेला कोट्यवधींचा प्रकल्प पुन्हा एकदा हाती घेतल्यास महापालिकेला त्यासाठी निधीची चणचण भासणार आहे. या प्रकल्पासाठी रस्ता पुन्हा खोदल्यास तो रस्ता पूर्ववत करण्याचा खर्चही वाढणार आहे.या प्रकल्पावर सुरुवातीला २०१२ मध्ये काम सुरू करण्यात आले होते. मात्र विविध परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात बराच कालावधी लागला.महापालिकेच्या रस्ते विभागाने २०१५ मध्ये पर्जन्य वाहिन्या विभागाला कोणतीही कल्पना न देता रस्त्याचे काम सुरू केले. त्यामुळे हा प्रकल्प हाती घेईपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले होते.या प्रकल्पामुळे अंधेरी येथील भुयारी मार्गात प्रत्येक पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका होईल, असे पालिका अधिकाऱ्यांना वाटते.
गुंडाळलेला प्रकल्प पुन्हा पालिकेच्या अजेंड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 12:55 AM