वैरागड संवर्धनासाठी मुनगंटीवारांना साकडे
By Admin | Published: May 25, 2017 12:38 AM2017-05-25T00:38:15+5:302017-05-25T00:38:15+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील वैरागड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील वैरागड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना साकडे घातले आहे. या किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू अत्यंत वाईट स्थितीत असून, त्याचे जतन करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्याची मागणी सह्याद्री प्रतिष्ठानने मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर म्हणाले की, चंद्रपूर व गडचिरोली विभागातील दुर्गप्रेमींनी १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील मिनार, बुरूज, तटबंदी, राजमहल, विहिरी, दरवाजे आणि बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तूंची सद्य:स्थिती दयनीय असल्याचे निदर्शनास आले. धक्कादायक बाब म्हणजे किल्ल्यावरील काही विहिरींमध्ये माती पडल्याने त्या संपूर्णपणे बुजल्याचे दिसले. तर काही विहिरींमध्ये चुन्याचे मिश्रण पडल्याने विहिरींमधील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही.
दुर्ग संवर्धन विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याची ही दयनीय अवस्था झाल्याचा आरोप प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे यांनी केला आहे. ते म्हणाले की, किल्ल्याचे बुरूज ढासळले असून त्याची योग्यवेळी डागडुजी नाही केली, तर ते नामशेष होण्याची शक्यता
आहे.
वैरागड हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. केंद्र पुरातत्त्व विभागाने काही कामे पूर्वी सुरू केली होती. मात्र आता ती ठप्प पडल्याचे दिसते. वेळीच किल्ल्यावर डागडुजी झाल्यास मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी आणि इतिहास संशोधक या ठिकाणी गर्दी करतील. तसेच पर्यटनाला अधिक वाव दिल्यास स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला आहे.