Join us

कुस्तीच्या आखाड्याची झाली कचराकुंडी

By admin | Published: March 21, 2016 1:59 AM

नेरूळमध्ये कुस्ती मल्लांना सराव करण्यासाठी तयार केलेल्या आखाड्यावर सिडकोने कारवाई केली आहे. कुस्तीपटू सराव करणाऱ्या या भूखंडाचा वापर आता डेब्रीज व कचरा टाकण्यासाठी केला जात आहे

नवी मुंबई : नेरूळमध्ये कुस्ती मल्लांना सराव करण्यासाठी तयार केलेल्या आखाड्यावर सिडकोने कारवाई केली आहे. कुस्तीपटू सराव करणाऱ्या या भूखंडाचा वापर आता डेब्रीज व कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. सिडकोचे भूखंड लाटणारे व इतर अतिक्रमणांना अभय देऊन आखाड्यावरच कारवाई केल्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून कुस्ती मल्ल व संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत. परंतु गोल्फ कोर्सला १०३ हेक्टर जमीन देणाऱ्या सिडकोने कुस्तीसाठी अद्याप एकही भूखंड दिलेला नाही. नेरूळ सेक्टर ६ मधील शुश्रूषा हॉस्पिटलच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर कुस्ती संघटक बापू उणावने यांनी स्वखर्चाने कचरा काढून आखाडा तयार केला होता. यासाठी सिडकोकडून सदर जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. जेव्हा सिडको ही जागा विकेल किंवा त्याची निविदा काढेल तेव्हा भूखंड खाली करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु सिडकोने सहा महिन्यांनंतर पुन्हा सदर जागा कुस्तीसाठी देण्यास नकार दिला. प्रथम आखाडा बंद केला व आता तेथील तात्पुरते शेडही काढून नेले आहे. वास्तविक सिडकोने ज्या भूखंडावरील आखाडा हटविला. त्या भूखंडाचा वापर एक बिल्डर अनेक वर्षांपासून करीत होता. या भूखंडावर विनापरवाना कामगारांसाठी पत्र्याचे शेड उभारले होते. शौचालय व इतर बांधकामही केले होते. परंतु सिडकोने त्यांच्याकडून भाडेही वसूल केले नाही व बिल्डरचे काम होईपर्यंत कारवाईही केली नाही. या ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या शेडचा वापर इतर नागरिक करीत होते. परंतु त्यांच्यावरही कारवाई केली नव्हती. परंतु कुस्तीच्या आखाड्यावर मात्र तत्काळ कारवाई केली आहे. येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारलेले शेडही अतिक्रमण विभागाने हटविले आहे. (प्रतिनिधी)