Join us

मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बांधल्या पर्यावरण पूरक राख्या कोरोना योध्यांच्या मनगटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 5:28 PM

कोरोना'तही झालं नातं अतूट…!

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्यांची वीण म्हणजे रक्षाबंधन . श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे.सध्या  जरी कोरोनाच सावट आहे.

येत्या रविवारी साजरा होणाऱ्या राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक  राख्या तयार करून गेली दीड वर्षे करोनात आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या केईम हॉस्पिटलच्या योध्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांच्या कर्मचाऱ्यांच्या मनगटी बांधून कोरोना'तही आपलं नातं अतूट केले  !रक्षा बंधनाचे औचित्य साधून या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्या आणि आपले संरक्षण करून कर्तव्य पार पडणाऱ्या  केईएम इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रविण बांगर तसेच सहाय्यक डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून यांच्या बद्दलचा आदर, प्रेम, ऋणानुबंध जपत  विद्यार्थ्यांकडून सलामी देण्यात आली व त्यांच्या सुखी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. प्रभाग क्रमांक 206 चे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी लोकमतला सदर माहिती दिली.

फ / दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल, परेल, लालबाग या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून  यंदा या शाळेतील विद्यार्थ्यांनी थर्माकोल किंवा प्लास्टिकचा उपयोग न करता पर्यावरणाबद्दलची संवेदनशिलता जपत पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या.

आपला भारत देश हा संस्कृतीप्रधान, कृषीप्रधान देश असून आपण अनेक सण.. उत्सव साजरे करतो. पण गेली दीड वर्षे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आपण आपल्या अनेक उत्सव आणि सणापासून वंचित झालो आहोत. 

तसेच या प्रातिनिधिक स्वरूपातील कार्यक्रमाला नगरसेवक, सचिन पडवळ, नगरसेवक अनिल कोकीळ, स्थापत्य समिती शहर दत्ता  पोंगडे यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच सोशल डिस्टन्सिन्गचे भान राखून आणि कायद्याच्या चौकटीत राहून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास  फ / दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी वीणा सोनावणे यांनी साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना प्रोत्साहन  दिले. हा संपूर्ण कार्यक्रम एज्युको संस्थेच्या संस्थापिका  मीनल श्रीनिवासन, कार्यकारी अधिकारी  रजनीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.